बिबट्या व हिंस्त्र पशूंचा मुक्त संचार; शेतकऱ्यांच्या संरक्षणार्थ उपाय योजना कराव्या – नवनीत पाटील
बिबट्या व हिंस्त्र पशूंचा मुक्त संचार; शेतकऱ्यांच्या संरक्षणार्थ उपाय योजना कराव्या – नवनीत पाटील
मुक्ताईनगर तालुक्यातील खूप मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र हे वढोदा वन परिक्षेत्रात येत असल्याने या वन परिक्षेत्रात बिबट्या तसेच इतर हिंस्त्र पशुंचा मोठ्या प्रमाणावर मुक्त समाचार आहे. सदरील पशूंचे अस्तित्व जरी वन क्षेत्रासाठी गरजेचे असले तरी या पशूंच्या मुक्त संचार ही कुऱ्हा वढोदा परिसरातील शेतकरी वर्गासाठी दहशतीची व भीतीची बाब ठरत आहे. कारण सदरील बिबट्या व इतर हिंस्त्र पशूंच्या मुक्त संचार व त्यांचे शेतकऱ्यांवर तसेच शेतकरी बांधवांच्या पाळीव प्राण्यांवर होणारे प्राणघातक हल्ले यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झालेले आहे. त्यामुळे सदरील हिंस्त्र पशूंचे व पशूंपासून शेतकरी वर्गाचे संरक्षण करण्यासंदर्भात इतर वन विभागात राबविल्या जाणाऱ्या संरक्षणात्मक उपाय योजना या भागात देखील राबविण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी , जळगाव ,उप वनसंरक्षक,जळगाव यांना केलेली आहे.
इतर ठिकाणी वनविभागाने बिबट्यांचे हल्ले टाळण्यासाठी विविध संकल्पना राबविल्या आहेत.सौर कुंपण योजना ही अत्यंत प्रभावी उपाययोजना ठरली आहे.सौर कुंपणामुळे बिबट्याला हलक्या स्वरूपाचा करंट लागून सायरन वाजतो.करंट लागल्यामुळे व त्याचवेळी वाजलेल्या सायरनमुळे बिबट्या त्या ठिकाणाहून पळून जातो.या योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधी उपलब्ध करून त्या त्या ठिकाणी संरक्षणात्मक उपाय करण्यात आलेले आहे. याच धर्तीवर वढोदा वन परिक्षेत्रातील कुऱ्हा वढोदा परिसरात संरक्षणात्मक उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.