मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदावर शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप आमनेसामने!

20251121_165724

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदावर शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप आमनेसामने!

मुक्ताईनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 माघारीनंतर आता अधिकच रोमहर्षक बनली आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर नगराध्यक्षपदासाठीची लढत थेट सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यामध्येच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन सत्ताधारी मित्रपक्षांमध्येच थेट सामना होत असल्याने महायुतीतील स्थानिक समीकरणांना वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

[metaslider id="6181"]

🔸 खडसे कुटुंबासाठी प्रतिष्ठेची लढत

या निवडणुकीला राजकीय वजन देणारी महत्त्वाची घटना म्हणजे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) निवडणुकीतून माघार जाहीर करणे. शहरात स्वतःच्या गटाची ताकद मर्यादित असल्याचे मान्य करून त्यांनी सुनेच्या नेतृत्वातील भाजपला छुपा पाठिंबा देत स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे ही निवडणूक थेट केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय प्रतिष्ठेची चुरस ठरणार आहे.

🔸 माघारीचे नाट्य : नगराध्यक्ष पदाचे तीन उमेदवार बाहेर

नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी माघार घेतली असून आता लढत द्विपक्षीय आहे.

नगराध्यक्षपदासाठी माघार घेतलेले उमेदवार :

1. वैशाली अशोक जावरे – अपक्ष

2. फाहेंमुनीसा यासीन खान – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

3. भाग्यश्री अजय जैन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

 

यामुळे लढतीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून , शिवसेनेच्या उमेदवार संजना चंद्रकांत पाटील व भाजपच्या भावना ललित महाजन यांच्यात थेट लढत होणार आहे.

🔸 नगरसेवक पदावर काही ठिकाणी दुहेरी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत

नगरसेवक पदासाठीही माघारीनंतरचे चित्र मोठे बदलले आहे. विविध प्रभागातून एकूण ९ उमेदवारांनी माघार घेतली असून काही प्रभागात थेट दोन प्रमुख पक्षांमध्ये सामना, तर काही ठिकाणी अपक्षांचा पगडा कायम राहिल्याने तिरंगी लढतीची शक्यता आहे.

प्रभागनिहाय माघारी :

प्रभाग क्र. 3 : योगेश अशोक काळे

प्रभाग क्र. 6 : करुणा पियुष हळदे

प्रभाग क्र. 8 : अश्विन अनिल सुरवाडे

प्रभाग क्र. 10 : निलोफर शाहरुख खान

प्रभाग क्र. 13 :

गणेश गोविंदा तेली

गणेश दामोदर महाजन

प्रभाग क्र. 14 :

रितेश नगीनचंद जैन

स्वप्निल विलास पाटील

प्रभाग क्र. 16 : कल्पना अविनाश बोरसे

माघारीनंतर प्रत्येक प्रभागातील समीकरणे नव्याने बदलली असून अंतिम लढतीत मतांची विभागणी निर्णायक ठरणार आहे.

 

माघारीनंतर मुक्ताईनगर निवडणुकीत आता शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप असा थेट आणि प्रतिष्ठेचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. महायुतीतील दोन्ही पक्ष स्थानिक स्तरावर एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने या निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे. नगराध्यक्षपदासोबतच नगरसेवक पदांच्या लढतीही तितक्याच चुरशीच्या होणार असून मुक्ताईनगरकरांचे लक्ष या निवडणुकीकडे खिळले आहे.

error: Content is protected !!