मुक्ताईनगरला नेहरू युवा केंद्राच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी :-
दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी शहरातील संत मुक्ताबाई कला वाणी जवगाव विज्ञान महाविद्यालयात सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या व विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव यांचे वतीने तसेच केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे व जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डांगर यांच्या मार्गदर्शनाखाली संत मुक्ताई युवा मंडळ, मुक्ताईनगर यांचे मार्फत शहरातील संत मुक्ताई महाविद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी युवकांसाठी कबड्डी व युवतींसाठी खो-खो या स्पर्धा घेतल्या तसेच, मुले व मुली यांच्यासाठी 100 मीटर धावणे व गोळा फेक या स्पर्धा देखील घेण्यात आल्या. सुरुवातीला सकाळी 11:00 वाजता प्राचार्य डॉ आय डी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी क्रीडा विभागाचे प्रा. डॉ. वीरेंद्र जाधव, प्रा. डॉ. रमेश शेवाळे, प्रा. डॉ. के. पी. पाटील, नेहरू युवा केंद्राचे माजी ता. समन्वयक निलेश मेढे स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. स्पर्धा संपन्न झाल्या नंतर सायंकाळी 04:00 वाजता संत मुक्ताई महाविद्यालयाच्या न्यानेश्वर सभागृहात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व मेडल देऊन गौरविण्यात आले व स्पर्धेत सहभागी युवक व युवतींना सहभागाचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. प्राचार्य डॉ आय डी पाटील, प्रा डॉ वीरेंद्र जाधव, प्रा डॉ रमेश शेवाळे, प्रा डॉ के पी पाटील, प्रा डॉ पंचशीला वाघमारे, नेहरू युवा केंद्राचे माजी समन्वयक निलेश मेढे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ पाटील यांनी उपस्थित युवक व युवतींना खेळाचे महत्व पटवून सांगितले तसेच डॉ शेवाळे यांनी युवक व युवतींना मार्गदर्शन करून विजेत्यांचे कौतुक केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नेहरू युवा केंद्राचे माजी तालुका समन्वयक निलेश मेढे यांनी केले. या नेहरू युवा केंद्राच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा अमर पाटील, ऍड. प्रफुल्ल मेढे आम्रपाली धुंदे, प्रज्वल पानपाटील, सचिन मेढे सिद्धांत सावळे, क्षितिज शिरतुरे व संत मुक्ताई युवा मंडळाचे सदस्य यांनी मेहनत घेतली.
तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेते यांची नावे खालील प्रमाणे :-
कबड्डी स्पर्धा (मुले) – प्रथम क्रमांक मुक्ताई युवा संघाने पटकाविला तर द्वितीय क्रमांक स्वराज्य क्रीडा मंडळाने पटकविला.
खो-खो स्पर्धा (मुली) – प्रथम क्रमांक संत मुक्ताई महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखा मुलींच्या संघाने पटकविला तर द्वितीय क्रमांक मुक्ताई महाविद्यालयातील प्रथम वर्ष वाणिज्य शाखा मुलींच्या संघाने पटकविला.
गोळा फेक स्पर्धा (मुले) :- प्रथम क्रमांक गोपाल सपकाळे, द्वितीय क्रमांक ललित पाटील, तृतीय क्रमांक घनश्याम कोळी.
गोळा फेक स्पर्धा (मुली) :- प्रथम क्रमांक माधुरी शिरसागर, द्वितीय क्रमांक नंदिनी महाजन, तृतीय क्रमांक रुचिता पाटील.
100 मीटर धावणे स्पर्धा (मुले) :- प्रथम क्रमांक हिमांशू भालशंकर, द्वितीय क्रमांक प्रवीण सोनवणे, तृतीय क्रमांक हिमांशु नाथजोगी.
100 मीटर धावणे स्पर्धा (मुली) :- प्रथम क्रमांक शीतल वानखेडे, द्वितीय क्रमांक धनश्री सपकाळे, तृतीय क्रमांक सपना राजपुत.