Jalgaon News: भारतीय राज्यघटना जगासाठी आदर्श ठरली आहे: ना. गुलाबराव पाटील
जळगाव: भारतीय प्रजासत्ताक (Republic Day) दिन आज सकाळी जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabarao Patil) यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांना पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान, भारतीय राज्यघटना जगासाठी एक आदर्श राज्यघटना ठरली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी केले.
ठरलेली आहे
पुढे बोलतांना ना. पाटील म्हणाले की, न्याय, समता, स्वातंत्र्य या लोकशाहीच्या उदात्त मुल्यांची देणं देणारी आपली राज्यघटना जगातील एक आदर्श राज्यघटना ठरलेली आहे. या राज्यघटनेमुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरु आहे. त्या वाटचालीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. प्रजासत्ताक गणराज्याची संकल्पना स्वीकारुन आपण लोकशाहीच्या मार्गाने उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाला वर्तमानात प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने सर्व प्रयत्नशील आहोत. सुरक्षा, आरोग्य, सामाजिक समता आणि समतोल विकास या संकल्पनांना केंद्रस्थानी ठेवून देशाची वाटचाल सुरु आहे. देशाच्या या प्रगत वाटचालीमध्ये महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय राहीलेले आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य हे देशातील आघाडीचे आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते.
पोलिसांची कवायत
कार्यक्रमाप्रसंगी पोलीस दलाच्या तुकड्यांनी मानवंदना दिली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी पोलिस दलाच्या तुकड्यांच्या कवायतीचे निरीक्षण केले. या संचलनात पोलीस मुख्यालय पुरुष/महिला, पोलीस मुख्यालय पुरुष, होमगार्ड पुरुष, एम. जे. कॉलेज NCC मुले, सेंट जोसेफ NCC बहिणाबाई युनिर्व्हसिटी NSS, आर. आर. विद्यालय RSP मुली, ओरियन इंग्लीश मिडीयम स्कुल स्काऊड व गाईड, आर. आर. विद्यालय गाईड मुली, सेंट.जोसेफ RSP मुले/मुली, श्रीराम माध्यमिक विद्यालय-RSP मुले, आर. आर. विद्यालय RSP मुले, श्रीराम माध्यमिक विद्यालय, RSP मुली, सेंट. जोसेफ गाईड मुली, सेंट. जोसेफ, स्काऊड मुले, स्टुडंट पोलीस कॅडेट आदि सहभागी झाले होते.
प्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, रविंद्र भारदे यांचेसह स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. दरम्यान, विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, राजेंद्र वाघ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी मंदार पत्की, तहसीलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.