हृदयद्रावक! मुक्ताईनगरजवळ डंपरखाली चिरडून एकाच कुटुंबातील तिघांचा अंत; मोठा मुलगा गंभीर जखमी
पुरनाड फाटा (मुक्ताईनगर): मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाटा येथे इंदोर-हैदराबाद महामार्गावर गौण खनिज वाहणाऱ्या एका भरधाव डंपरने दुचाकीला चिरडल्याने शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर २०२५) दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी आणि त्यांचा सात वर्षांचा लहान मुलगा जागीच ठार झाले, तर त्यांचा ११ वर्षांचा मोठा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर संतप्त जमावाने डंपर चालकाला बेदम चोप देत वाहनाची तोडफोड केली आणि ते जाळण्याचाही प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अपघाताची हृदय पिळवटून टाकणारी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरजवळ पुरनाड फाटा येथे महामार्गाचे काम ‘बी एन अग्रवाल’ ही कंपनी करत आहे. या कंपनीचा मुरूम भरलेला डंपर क्रमांक MH 19 CX 2038 हा भरधाव वेगात जात असताना त्याने दुचाकी क्रमांक MP 48 ML 2695 ला जोरदार धडक दिली.
या दुर्घटनेत दुचाकीवर असलेले नितेश जगतसिंग चव्हाण (वय ३२), त्यांची पत्नी सुनिता नितेश चव्हाण (वय २५) आणि त्यांचा लहान मुलगा शिव नितेश चव्हाण (वय ७) (सर्व रा. मातापूर, ता. डोईफोडा, जि. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) हे तिघे डंपरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात कुटुंबातील मोठा मुलगा नेहाल नितेश चव्हाण (वय ११) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे. हे चव्हाण कुटुंब सध्या कामानिमित्त जळगाव येथे वास्तव्यास होते आणि दुचाकीने ते सर्व जण इच्छापूर येथील देवीच्या दर्शनासाठी जात होते. मात्र, इच्छापूरला पोहोचण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
संतप्त जमावाचा उद्रेक
या हृदयद्रावक घटनेमुळे पुरनाड फाटा परिसरात मोठा जमाव जमला. बी एन अग्रवाल कंपनीचे चालक नेहमी मद्यपान करून वाहने चालवतात, असा आरोप करत संतप्त जमावाने डंपर चालकाला मारहाण केली. तसेच, जमावाने डंपरची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करत ते जाळण्याचाही प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. एकाच कुटुंबातील तिघांच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.