शिवसेनेकडून अध्यात्मिक सेनेचा विस्तार; अक्षय महाराज भोसले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष व प्रवक्ते पदाची धुरा
मुंबई | घटस्थापनेच्या पवित्र मुहूर्तावर शिवसेना (शिंदे गट) कडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. अध्यात्म आणि समाजकारणाचा सेतू बांधणाऱ्या अध्यात्मिक सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी अक्षय महाराज भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रवक्तेपदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
ही नेमणूक उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली असून, संपूर्ण राज्यभर अध्यात्मिक शक्तींच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.
शिवसेनेच्या अध्यात्मिक सेनेत आता ५० पेक्षा अधिक पंथ, संप्रदाय व मठांचे मान्यवर संत, महंत व विचारवंत सहभागी होत आहेत. त्यामुळे अध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून समाजाशी अधिक जवळीक साधत, धर्म, संस्कृती आणि राष्ट्रभक्ती यांचं बळकटकरण करण्याचा शिवसेनेचा निर्धार अधिक दृढ झाला आहे.
या नव्या अध्यात्मिक चळवळीच्या नेतृत्वाची जबाबदारी अक्षय महाराज भोसले यांच्यावर सोपविल्यानंतर राज्यभरातून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत आणि अभिनंदन होत आहे. विविध ठिकाणी स्वागत समारंभ, कीर्तन, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
अध्यात्म आणि राजकारण यांचा संगम घडवत, समाजाच्या मनोभूमीवर सद्भाव, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठा बिंबवण्याचे कार्य अध्यात्मिक सेनेतून होणार असल्याचे संकेत शिवसेनेने या निर्णयातून स्पष्ट दिले आहेत.