गुटखा तस्करीचे रॅकेट
तस्कर व अधिकाऱ्यांचे साटेलोटे
चौकशी अंती कारवाई करा
अन्यथा शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात
परराज्यातून मुक्ताईनगर पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा तस्करी व इतर अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून लाखो करोडोंच्या तस्करीत रॅकेट सामील असल्याचे उघडकीस येत आहे. या संदर्भात शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, यांना सखोल चौकशीसह संबंधित तस्कर तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा शिवसेना प्रचंड आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुका हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर असल्यामुळे गुटखा तस्करांसाठी हा तस्करीचा प्रमुख मार्ग ठरत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पोलीस व अन्न व औषध प्रशासनातील काही अधिकारी तस्करांशी अर्थपूर्ण साटेलोटे करून तस्करीला पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी देखील गुटखा तस्करीत मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चा एक अधिकारी अर्थपूर्ण व्यवहारातून निलंबित झाल्याची घटना नुकतीच घडलेली आहे.
2 कोटींचा गुटखा जप्त:
नुकतेच दोन ते तीन दिवसांपूर्वी सुमारे 2 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याआधीही लाखो रुपयांचा गुटखा तस्करीसाठी पकडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जळगाव येथून येणाऱ्या पथकांनी ही कारवाई केली, परंतु स्थानिक पोलिसांनी या कारवायांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
त्यामुळे या तस्करीत मोठे रॅकेट सक्रिय असून स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
अन्यथा आंदोलनाचा इशारा:
जर वेळेत योग्य ती कारवाई झाली नाही, तर आगामी विधानभवन अधिवेशन काळात शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.