मोठी बातमी : उप जिल्हा रूग्णालय मुक्ताईनगर येथे झाली अपेंडिक्स वर पहिली यशस्वी शस्त्रक्रिया
मुक्ताईनगर उप जिल्हा रूग्णालय येथे आज दि.१ ऑक्टोंबर २०२४ रोजी प्रथमच अपेंडिक्स या आजारावर हिवरा ता मुक्ताईनगर येथील रशिदाबी रुबाब तडवी या महिलेची अपेंडिक्सची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या आदेशान्वये,वैद्यकिय अधीक्षक डॉ योगेश राणे यांच्या देखरेखखाली जनरल सर्जन डॉ पारितोष कुरुंद,भूलतज्ज्ञ डॉ गायत्री चौधरी, अधिसेविका श्रीमती आशा चिखलकर, शस्त्रक्रिया गृह इन्चार्ज श्री योगेश ठाकरे, अधीपरीचारिका श्रीमती मोनिका कोळी,श्रीमती प्रतिभा कोळी, कु अश्र्विनी इंगळे, कक्षसेवक प्रदिप काळे, सफाईगार कविता डोंगरे, सुरक्षा रक्षक बंटी सपकाळे यांनी परिश्रम घेतले.
या शस्त्रक्रियेने मुक्ताईनगर मतदार संघातील गोरगरीब जनतेला खूप मोठा दिलासा मिळाला असून जळगाव व इतर ठिकाणच्या महागड्या वैद्यकीय लूट पासून त्यांची सुटका होणार मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाने टाकलेली कात यामुळे आनंदाचे वातावरण आहे. तर येथे यापूर्वी हर्निया व इतर गाठीच्या शस्त्रक्रिया देखील यशस्वीपणे पार पडलेल्या आहेत. त्यामुळे आज पार पडलेल्या अपेंडिक्स च्या यशस्वी शस्त्रक्रियेने मुक्ताईनगर मतदार संघातील गोरगरीब व सर्व सामान्य जनतेच्या आशा पल्लवित झाल्या असून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुन्हा बदलला असून रुग्णालयाने ज्याप्रमाणे कोरोना काळात संपूर्ण जिल्ह्यात चांगल्या कार्याचा ठसा उमटविला तसाच भविष्यात अशा शस्त्रक्रियांनी या रुग्णालयाचा नावलौकिक होईल अशी भावना व्यक्त केली जात आहे.