संत निवृत्तीदादांचे,संत मुक्ताईंच्या अंतर्धान सोहळ्यासाठी प्रस्थान !
लाखो भाविकांना मिळणार देव व संत दर्शनाचा लाभ !
संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथमहाराज समाधी संस्थान व श्रीमंत माउली प्रतिष्ठान आयोजित पालखी पादुका सोहळ्याचे,
श्रीसंत मुक्ताबाई यांच्या ७२७ व्या अंतर्धान समाधी सोहळ्यास भेट देण्याकरीता
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथमहाराजांच्या पादुका पालखी सोहळ्याचे, त्र्यंबकेश्वर जि.नाशिक येथून जळगाव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मुक्ताईनगरला आज दि. १ जुन २०२४ रोजी सकाळी प्रस्थान झाले.
निवृत्तीराजें धरिली मुक्ताबाई हातीं । सांभाळीत जाती निशिदिनी ।।
या अभंगाच्या उक्तीप्रमाणे , संत ज्ञानेश्वर माऊली व संत सोपान काका यांनी समाधी घेतल्यानंतर हताश व उद्विग्न झालेला संत मुक्ताबाई या उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील तत्कालीन महतनगर व आताचे श्रीक्षेत्र मुक्ताईनगर या भागात आल्या असता त्यांच्यासोबत पंढरीश परमात्मा श्री पांडुरंगराय, रुक्मिणी माता तसेच संत नामदेव महाराज संतश्रेष्ठ निवृत्तीदादा प्रत्यक्ष हजर होते. त्यावेळी झालेल्या वैशाख वद्य दशमीला वादळी वारा व विजेच्या कडकडाटात आदिशक्ती संत मुक्ताई अंतर्धान पावल्या होत्या. याच अनुषंगाने आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंचा अंतर्धान सोहळा होत असताना पंढरीष परमात्मा पांडुरंगराय, पंढरपुर, श्री रुक्मिणी माता कौंडीण्यपूर, संत नामदेव महाराज, पंढरपूर तसेच संत निवृत्तीदादा त्र्यंबकेश्वर जि. नाशिक या संस्थानांच्या वतीने आजही ही परंपरा जोपासली जाऊन आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या अंतर्धान सोहळ्याच्या वेळेस उपस्थिती देत असतात. त्याच अनुषंगाने सर्व पालखी सोहळे मुक्ताईनगर कडे मार्गस्थ झाले असून संत निवृत्ती दादांचाही पालखी सोहळा बहिण संत मुक्ताईच्या भेटीच्या ओढीने मार्गस्थ झालेला आहे.
या सर्व देव व संत पालखी सोहळ्यांचा एकत्रित येण्याचा योग आदिशक्ती संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्याला येत असतो अशा दुग्ध शर्करा संधी मुळे लाखो भाविकांना देव व संत दर्शनाचा लाभ मिळत असतो.