मुक्ताबाईंची समाधी Muktabai Samadhi
१. महतनगरला (एदलाबादला) व आताचे श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ला गमन
वेरूळाची यात्रा केली यथासांग । मग पांडुरंग निघते झाले ॥ ५ ॥
वेरूळ ते महतनगर मार्ग, फुलंब्री, भोकरदन, अजिंठा लेणी पाहून फत्तेपूर मार्गे बोदवड व तेथून महतनगरला (एदलाबाद) गेले. रस्त्याने जाताना मुक्ताबाई आपल्या स्वरूपात मग्न असत. जास्त कोणाशी बोलत नसत. कोणी काही विचारले तर त्याचे तेवढेच उत्तर देऊन गप्प राहावयाच्या. जेवणात लक्ष नव्हते. त्यांना उदास वाटायचे. आई-वडील गेले. ज्ञानेश्वर गेले. सोपानदेव गेले. जीवलग जो गळ्याचा ताईत पुत्राठाई मानलेला तो शिष्य चांगदेवही गेला. अशा एक एक कारणामुळे मुक्ताबाई फारच उदास झाल्या होत्या. त्यांना आता हे शरीर ठेवू नये असे वाटत होते. त्यामुळे आपला जो खरा आत्मानंद त्यात त्या रममाण होत होत्या. त्यांनी सर्व देहभाव सोडले होते. अन्नपाणीही वर्ज्य केले होते. मुक्ताबाई जेवत नसे तर निवृत्तिनाथ तरी कसे जेवतील ? व निवृत्तिनाथ जेवले नाही तर बाकीचे संत तरी कसे जेवतील ? त्यामुळे सर्वांनीच अन्नपाणी सोडले होते.
मुक्ताबाई उदासी झाली असे फार । आतां हे शरीर रखूं नये ॥ १ ॥
त्यागिले आहार अन्नपाणी सकळीं । निवृत्तिराज तळमळी मनामाजी ।। २ ।।
गंगाधारेवर एक मास राहिले
वेरूळवरून ही मंडळी महतनगरला नृसिंहजयंतीला पोहोचली असावी. कारण अभंगात असे म्हटले की, ‘अर्ध मास वैशाख, अर्धमास ज्येष्ठ असा एक
पूर्ण महिना तेथे मुक्काम केला. यावरून समाधीकाळाच्या अगोदर महतनगरला पौर्णिमा किंवा वैशाख शु. १४ ला (नृसिंह जयंतीस) आले असे मानले पाहिजे. याप्रमाणे महतनगरला वैशाख शु. १४ (नृसिंह जयती) करून पौर्णिमेस ही भक्त मंडळी तापी तीरावर आली-
वद्य वैशाख मासी दशमीचे दिवशी । गेले ते स्नानासी तापी तीरा ।।
असे हे वर्णन असले तरी पण ते समाधिकालाचे आहे. वैशाख वद्य दशमी हा समाधिकाल आहे. त्याच्या पंधरा दिवस अगोदरच चांगदेवाच्या संगमाच्या जवळ गंगाधारेवर किंवा महतनगरला येऊन राहिले.
अर्धमास वैशाख अर्धमास ज्येष्ठ । फार होती कष्ट निवृत्तिराजा ।।
या कडव्यात हे वैशाख शुद्ध पौर्णिमेपासून तेथे महतनगरला राहिले, हे सिद्ध आहे. म्हणून वद्य १० (दशमी) लाच तेथे महतनगरला पोहोचले असे मानू नये. तर त्या कडव्यात ते वैशाख वद्य दशमीचे समाधिस्नान सांगावयाचे आहे. जसे ज्ञानेश्वर, सोपानदेव, चांगदेव यांना समाध्या देण्याच्या अगोदर स्नानाचे वर्णन आले आहे, तसेच मुक्ताबाईंच्या समाधीच्या अगोदरचे ते दशमीचे स्नान समजणे. ते स्नान वैशाख वद्य १० स केले असे मानले की विसंगती येत नाही. अर्धमास वैशाख या कडव्यावरून हे भक्त वैशाख शुद्ध पौर्णिमेलाच महतनगरला गेले.
नंतर मुक्काम गंगाधारेवर केला. कारण गंगा, यमुना, सरस्वती अशा नद्या परशुरामाने निर्माण केल्या व तेथे आपल्या हातानेच सोमेश्वर लिंगाची स्थापना केली. याच सोमेश्वराची पुत्रप्राप्तीकरता अत्रीच्या सांगण्यावरून चंद्र व रोहिणीने पूजा केली. जवळच मानेगावला मार्कंडेयाची तपोभूमी आहे. ही हल्ली गोसाव्याची टेकडी म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे आतापर्यंत सरकारी उत्पन्न चालू होते. ही मंडळी चांगदेव येथे म्हणजे सुंदरनगरला न राहता महतनगर व सुंदरनगरच्या मध्ये बाणगंगेवर सोमेश्वराच्या जवळ थांबली. ते मनोहर स्थान होते. याचे वर्णन नामदेवराय करतात.
गंगाधारेवरील उपवनाचे वर्णन
फुलले अनेक तरुवर तेथें । दूर्वा दर्भ आंत उगवले ॥ १ ॥
करंज जांभळी लागली एक थाटी। वरी बहू दाटी तरुवरांची ॥ २ ॥
अमृत फळे अपार विस्तारले फार । त्यामाजी मयूर टाहो देती ॥ ३ ॥
कंठ कोकिळा त्या सुस्वर गायन । तरुवर सुमनें परिमळ ।॥ ४ ॥
पारिजातकांची दाटी झाली भारी। आत मैलागिरी डुल्लताती ।। ५ ॥
नामा म्हणे देवा भला हा एकांत । मार्कंडेयें येथे तप केलें ॥ ६ ॥
(ना. गा. ११८०)
वरील सुंदर उपवनाचे वर्णन चांगदेवाला तापी संगमाच्या वाळवंटात जमत नाही. चांगदेवाला नदी मोठी असली, तरी त्या वाळवंटात थोडीच झाडे असू सोने शकतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात नदीत उन्हात उतरू तरी कसे शकतील व उन्हाळ्याच्या दिवसात महिनाभर वाळवंटात राहणे कसे शक्य आहे ? बरे, गावात तरी हजारोंनी असंख्य असणारी मंडळी कशी मावेल ? त्या अर्थी ही सर्व मंडळी महिनाभर गंगाधारेवर, सोमेश्वर व मार्कंडेयांच्या सान्निध्यात राहिली हेच मानले पाहिजे. तेथे सोमेश्वर उत्पन्न होण्याचे कारण काय ? प्रत्येक लिंग हे कोणीतरी स्थापन केलेले असते. जसे रामेश्वर महालिंग रामाने, गोकर्ण लिंग रावणाने स्थापन केले. असे प्रत्येकाचे कारण असते. तसेच तीर्थयात्रा करत असता परशगंगेवर परशुरामाने सोमेश्वर लिंग स्थापन केले. यास बाणगंगेची जिवंत खूण आहे. त्याची उपासना सोमाने चंद्राने केली. तसे मेहूणला सोमेश्वर कोणी मांडला व त्याचे कारण काय ? असा मेहूणला काहीच हेतू दिसून येत नाही व परशगंगेवर मात्र परशुरामानेच बाण मारून त्रिवेणी गंगा काढली. त्यामुळे तेथे सोमेश्वर स्थापन करणे शक्य आहे. अशा त्या सोमेश्वर व गंगाधारेच्या पूर्वेला सरासरी मानेगावच्या समीप ही भावंडे उतरली. तापी संगम चांगदेवला आहे. तेथे संगमात हे उतरले असे मानता येत नाही. कारण नामा म्हणे देवा भला हा एकांत। मार्कडेयें येथें तप केलें ॥ ६ ॥ हे वचन लागत नाही. चांगदेवाच्या सुंदर नगरला एकांत नाही. कारण ते प्राचीन कालापासून मोठे गाव आहे व तेथे मार्कंडेयाने तप केले नाही. सुंदर उपवनाची संगतीही चांगदेवाला लागत नाही.
४. परशुराम तीर्थावरील उपवन
तर चांगदेवाच्या शेजारी असणाऱ्या परशुराम तीर्थाचेच हे सर्व सौंदर्य वर्णन आहे. जसे शेताच्या बांधावर दगडाची खूण, वहईची खूण, झाडाची खूण असते. त्यांपैकी दगड उपटून दुसरीकडे पुरता येतो. वन्हईसुद्धा सरकविता येते, पण झाडाची जिवंत खूण मात्र सरकविता येत नाही, बदलता येत नाही. कारण ती जिवंत खूण आहे. तशी मुक्ताबाईच्या स्थानाविषयी जिवंत खूण आहे, ते म्हणजे परशुराम तीर्थ. ते काही इकडचे तिकडे सरकवता येत नाही. सोमेश्वर कोणत्याही महादेवाला म्हणता येईल. पण मेहुणच्या वाघाट्याच्या नाल्याला परशुराम तीर्थ म्हणता येणार नाही. गंगाधारेवर मात्र प्रत्यक्ष गोमुखातून गंगा पडते हे अबाधित, अव्याहत, अचल, असंशयित अखंड धार चालूच आहे, यात शंका नाही. गंगाधारेच्या चारी बाजूस अजून उंच सखल भाग असून जमीन जरा पिवळी, चुनखडी, काही बरडीरान, दगडी भाग, फार ढाळाची, काही थोडी सपाट, काही मळवटी भाग, काही खोरे, काही टेकड्या असा भाग असल्यामुळे तेथे रमणीय अरण्य शक्य आहे. पूर्वी हे उपवन (महतनगर) हल्लीचे एदलाबाद मुक्ताईनगर ते चांगदेव असावे. कारण एदलाबाद ते चांगदेवाच्या परिसरात खूप मोठ्या टेकड्या आहेत. उंचसखल भाग आहेत, ओढे आहेत, खोरी आहेत. सर्वच प्रकारची जमीन असल्यामुळे असे वन शक्य आहे. जर मेहुण हे महतनगर मानले तर अशा थोर नगरीत अरण्याचे वर्णन कसे जुळेल ? तसेच प्राचीन नगराचे अवशेष मेहुणला काहीच सापडत नाहीत. मेहुण हे थोर महतनगर मानले तर तेथे त्याचे विरुद्ध एकांत वन हे दोन्ही जमत नाही. एकाच स्थळास निरंजन वन व थोर महतनगर संज्ञा जमत नाहीत. या शब्दाचा विरोध एदलाबादला नाही का येणार ? जर एदलाबाद महतनगर मानले तर एकांत जमत नाही व तेथे एकांत मानला तर महतनगर जमत नाही.
५. परशुरामे तेथे मारियेला बाण
यास उत्तर एदलाबाद शहर वेगळा भाग आहे व ही भक्तमंडळी उतरण्याचा परशुराम तीर्थाचा वेगळा भाग आहे. कारण प्रथम कोथळीच्या परिसरात चार दिवस थांबून पुढे महिनाभर गंगाधारेच्या व मानेगावच्या परिसराता ही मंडळी उतरली. त्यामुळे तो भाग एदलाबाद राजधानीला सोडून ३ मैल आहे व मेहुणला असे भाग दाखवायला काहीच अंतर नाही. म्हणून एकांतवन व महतनगर हे परस्पर विरोधी धर्म एकाच स्थळावर कसे शक्य आहेत ? मेहुणला परशुरामाने मारलेला बाण नाही. मार्कंडेयास तपाला योग्य डोंगर म्हणा दरी म्हणा काहीच नाही. उगीच उंदरासारखी जमीन उकरून तेथे मार्कंडेय बसला नसेल. याकरिता गंगाधारेजवळील टेकडीच मार्कंडेयाची टेकडी घेणे. तसेच प्राचीन जे राजधानीचे ठिकाण महतनगर ते एदलाबाद आहे. कारण तेथे आजही जुने किल्ले आहेत. त्यात मराठ्यांच्या समाध्या आहेत, देवी आहे. त्याला सोडून एका अर्वाचीन खेड्याला महतनगर म्हणणे योग्य वाटत नाही. ज्या एकांताच्या ठिकाणी मार्कंडेयाने तप केले व जेथे सोमेश्वर आहे, तेथे परशुरामाने बाण मारून गंगा काढली. तेथे ही मंडळी उतरली व एक महिनाभर राहिली. ते ठिकाण महतनगर म्हणजे एदलाबाद प्रगणेमध्ये येत असल्यामुळे त्याचा उल्लेख अभंगात आला आहे व तेथल्या उपवनाचेही वर्णन त्याच अभंगात आहे. गंगाधारेला चारी बाजूने उपवन असून तापी संगमही जवळच पडतो. त्याच तापीतीराचे वर्णन करतात. हे चांगदेवाचे म्हणजे सुंदर नगराचे वर्णन आहे.
६. धन्य तापी तीर
सोनियाची झाडे अनेक कर्दळी । त्यांत रानकेळी फोफावल्या ॥ १ ॥
सिताफळी भरीत अवघी तापी थडी । दाट दिसती गाढी रामफळें ॥ २ ॥
तापी तीरी ऋषी आणि सारंगधर। पाठीमागे भार वैष्णवांचे ॥ ३ ॥
तापीच्या तीरावर काही ऋषिमुनी थांबले व काही वारकरी व निवृत्ती, नामदेव हे संत थोडे मागेच म्हणजे गंगाधारेवर थांबले. काही मंडळी तर तापीच्या पैलतीरावरही उतरली होती. ते सर्व एकत्रच उतरत होते असे नाही. कारण अभंगातच तापी तीरावर ऋषी मुनी उतरले व निवृत्ती नामदेव हे संत पाठीमागे म्हणजे गंगाधारेवर उतरले, असे आहे.
जुन्या काळात अशी रीत होती की, कोणतेही गाव सांगायचे झाले तर डोंगर किंवा राजधानीचे गाव किंवा महानदीचे नाव सांगत असत. उदा. आम्ही गंगाथडीचे आहोत, असे सांगत असत. वास्तविक तो मनुष्य गंगेपासून बारा कोस अंतरावर राहात असे. आम्ही अमक्या घाटावरचे आहोत असे म्हणण्याची पद्धत होती. वास्तविक तो डोंगर त्याच्या गावापासून दूर असायचा. कारण पूर्वी तालुके नव्हते, जिल्हे नव्हते. मध्यंतरी प्रगणे होते व त्याच्याही अगोदर नुसते नद्या, डोंगराच्या नावावर देश व गाव सांगण्याची पद्धत होती किंवा ज्या राज्यात आपले गाव आहे त्या राजधानीचे नाव सांगत असत व त्या पद्धतीला धरूनच तापीतीर व महतनगर शब्द वापरले आहेत. तसे पाहिले तर (१) गंगाधार (२) मार्कंडेय तपोभूमी (३) सोमेश्वर (४) महतनगर (एदलाबाद) सुंदरनगर हे सर्वच तापी तीरावर म्हणता येतात. शिवाय यात्रेकरू खूप असल्यामुळे आपापल्या सोयीने देव, ऋषी, संत, भक्तमंडळी उतरले होते. काही तर तापीच्या पलीकडेही जाऊन उतरले होते. जसजसा सावलीचा आश्रय मिळाला तसतसे उतरत होते. ‘दोन्ही थडी भार पताकांचे’ असे म्हटले आहे. हे सुंदर नगरचे वर्णन आहे.
७. गेले ते स्नानासी तापीतीरा
पण खुद्द नामदेव, मुक्ताबाई व निवृत्तिनाथ हे गर्दी सोडून मागे गंगाधारेवर उतरले होते. जर प्रत्यक्ष तापीच्या तीरावरच एक महिना अगोदरपासूनच उतरले असते तर अभंगात ‘गेले’ असे कसे म्हणता आले असते. म्हणून सुंदरनगरपासून दूर होते.
वद्य वैशाख मासी दशमीचे दिवशी । गेले ते स्नानासी तापी तीरा ।।
जर दशमीला स्नानाला गेले तर अगोदर कोठेतरी दूर अंतरावर उतरले हे
ओघानेच सिद्ध झाले व इकडे अर्धमास वैशाख असे अभंगात म्हटले आहे. तर नदी सोडून दूर कोठे तरी पंधरा दिवस अगोदर उतरले होते व तेथून दशमीला स्नानाला गेले, असा अर्थ होतो. मग ते दुसरे स्थान गंगाधार म्हणा किंवा राजधानी महतनगरला (एदलाबादला) होते असे म्हणा. जर मेहुणला उतरले तर दशमीला गेले असे म्हणण्याची गरज काय ? कारण मेहुण अगदी नदीच्या काठीच असल्यामुळे तेथे ‘गेले ते स्नानासी तापीतीरी’ हे कडवे जमत नाही. रोज पंधरा दिवस अगोदर मेहुणला राहून तापीस्नान करणार नाही हे कसे शक्य आहे ? व तशी मेहुणला दुसऱ्या ठिकाणी स्नानाची व्यवस्थाही नाही व ते रोज जर तापी स्नान करत असतील तर दशमीचे दिवशी ‘गेले ते स्नानासी’ हे कसे म्हणता येईल. त्याअर्थी ते मेहुणला उतरले नव्हते किंवा तापीच्या वाळवंटातही उतरले नव्हते. कारण दशमीला गेले हे बरोबर लागणार नाही. गंगाधारेवर मात्र त्यावेळी हत्तीच्या सोंडेसारखी पाण्याची अखंड धार चालू होती म्हणून तेथे स्नान शक्य आहे. तेथे गोमुख कुंडावर रोज स्नान करीत, पण दशमीला मात्र तापीस्नानास गेले हे जमते व हे संत जरी दशमीला गेले तरी त्यांची मंडळी तापीपर्यंत उतरली होती. ते तेथल्या तेथेच रोज स्नान करीत असतील.
८. पंचक्रोशीची चतुःसीमा
या सर्व विषयावरून संगमाच्या पूर्वेस ही भक्त मंडळी उतरली होती, ते स्थान मध्यभागी येते. पूर्वेकडून महतनगर, पश्चिमेकडून परशुराम तीर्थ व योगी जो चांगदेव, त्याचे तापीतीर व दक्षिणेकडून मार्कंडेय तपोभूमी अशी ती टेकडी व वायव्येला तापी पयोष्णी ह्या महान नद्यांचा संगम अशा या मध्यबिंदूच्या ठिकाणी अगोदर ही मंडळी पंधरा दिवस राहिली.
धन्य महत नगर धन्य सोमेश्वर । धन्य तापी तीर योगियांचे ।।
मुक्ताबाई गुप्त होण्याच्या चारही बाजूच्या चतुःसीमा या कडव्यात दाखविल्या आहेत व ज्याला चतुःसीमा सांगितलेल्या असतात, त्यालाच क्षेत्र ही संज्ञा येते. तापीचे एवढे मोठे वाळवंट सोडून गंगाधारेवर का राहिले यास उत्तर उन्हाळ्यात सावलीची आवश्यकता असते.
उष्ण काळी छाया आवडती फार । म्हणती ऋषिवर रम्य स्थळ । म्हणून तेथेच विमाने उतरली व नामदेवांनीही तेथेच उतरण्याचा आग्रह धरला.
नामा म्हणे देवा रंगलें अंतःकरण । उतरलीं विमानें गंधर्वांचीं ।।
जेथे उतरले त्या गंगाधारेच्या प्रवाहात नाना वर्णांची सुंदर कमळे व त्यावर पांढरे, पिवळे, लाल भ्रमर गुंजारव करीत असून तो ध्वनी वैष्णवांच्या कानावर येत असे. टेकडीवरून सुंदर तापीचे दृश्य दिसायचे. खूप उंच वाढलेली झाडे होती. त्यांना नवीनच पालवी आलेली होती. अशा रम्य ठिकाणी त्यांनी काही काळ मुक्काम केला.
९. मुक्ताबाईच्या समाधीचे वर्णन
असे ते रम्य स्थळ पाहून नामदेवाने देवांस डोळ्याने खुणाविले की हेच मुक्ताबाईला योग्य ठिकाण आहे. कारण या ठिकाणी मन स्थिर होऊन, अज्ञान जाऊन बुद्धीत ज्ञानाचा उजेड पडला आहे. गीतेत सांगितल्याप्रमाणे सर्वगुणसंपन्न हे स्थळ आहे.
“शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः”
गंधर्व गायनें आलापीत सुस्वरीं । केलें स्पष्ट नयनीं गुहा गौप्य । नामा म्हणे देवा मन झालें स्थिर । पडियेला विसर अविद्येचा ।।
मग त्या ठिकाणी एका बाजूला निवृत्ती व मुक्ताबाईने समाधी घेण्याविषयी चर्चा केली. निवृत्तिनाथ म्हणतात की, ‘आपण केव्हा समाधी घेणार आहात ? स्वस्वरूपी केव्हा मिळावयाचे आहे ? कोणत्या दिवशी गमन करावयाचे आहे ? तुमच्यामुळे मी अडकून पडलो आहे.’ त्यावर मुक्ताबाई म्हणाल्या की, ‘अहो, जावे यावे कोठे ? सर्वच भगवंताचे स्वरूप आहे.’
आता देह जावो अथवा राहो । आम्ही तो केवळ वस्तूची आहो ।।
(किंवा ) आमुच्या ब्रह्मभावा बिघाड नोहे ॥
अहो, आकाशात कडाडून वीज उत्पन्न होते, मग ती कोठे जाते ? ती
जशी आपल्या स्वरूपात मिळून जाते किंवा दिवा मालविल्यावर ज्योत जशी सहज निरंजनात विलीन होते. हे सर्व भाषण नामदेव ऐकत होते. ते म्हणाले, सुवा, ही मुक्ताबाईसुद्धा बोलता बोलता अशीच जाईल, असे माझ्या चित्तास कळून आले.’
मुक्ताबाई निवृत्तिनाथांस म्हणाली की, ‘आमच्या स्वस्थानात अंधार नाही, म्हणजे आम्हांस स्वस्वरूपाचे आवरण नाही. आम्हांस हे सर्व चराचर भगवंत रूप, ज्ञानरूपच दिसते. म्हणजे प्रपंचात असतानाही आम्हांला अज्ञानाचे आवरण नाही. आम्ही स्वरूप सोडून कधी आलो, की आता देहदशा टाकून स्वरूपात मिळायचे ? सर्वच ब्रह्मरूप आहे. आम्ही ज्ञानाचा नंदादीप उजाळला आहे.’ असा संवाद झाला व गुह्य चर्चा केली. यावरून काय करायचे ते ठरविले असावे. समाधी घ्यायची की अर्धोदक करावयाचे किंवा कुंभक करून प्राणोत्क्रमण करावयाचे की योगाग्नीने देह दग्ध करावयाचा की शंकराचार्यांसारखा गुहाप्रवेश करायचा ? किंवा गार्गीप्रमाणे ब्रह्मकुमारी राहून परमार्थात आयुष्य घालवावे, अशी खूप चर्चा झाली असावी. कारण त्या चर्चेला नामदेवांना सुद्धा नेले नव्हते. समाधी घ्यावी तर अजून कोण्या स्त्रीने समाधी घेतल्याचा दाखला नाही. अर्धोदक केले तरी जीव दिला असा अपवाद येईल. गुहाप्रवेश केला तरी कुठे निघून गेली, बेपत्ता झाली, असे काहीतरी लोक म्हणतील. कुंभक करून प्राणोत्क्रमण करणेसुद्धा अवतारी पुरुषाला शोभत नाही. तर आपण हे काहीच करू नये. महाप्रलयापर्यंत मारुतीप्रमाणे चिरंजीव राहून कुमारी अवस्थेत राहणेच योग्य आहे. असे बोलून निवृत्तिनाथांनी मुक्ताबाईच्या डोक्यावर हात ठेवून तिला चिरंजीव केले.
मास्ती चिरंजीव असला तरी वाटेल त्याच्या नजरेस पडत नाही. ते जसे गुप्तरूपाने राहतात तसे आपणही अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य व दहा अवतारांपैकी परशुराम यांचे प्रमाणे चिरंजीव आहे हे सुचवायचे होते. म्हणून तेथे गुप्त होण्याचे ठरविले. परशुराम जसा चिरंजीव तशी त्या तीर्थावर गुप्त होणारी मुक्ताबाईसुद्धा चिरंजीवच आहे. मुक्ताबाईला या देहाने
राहावे हे फारसे रुचत नसले तरी निवृत्तीच्या आज्ञेने त्यांना राहावे लागले. असा विचार होऊन श्रीगुरु निवृत्तिनाथांनी मुक्ताबाईंच्या डोक्यावर अभय हस्त ठेवून ‘चिरंजीव भव’ असा आशीर्वाद देऊन रामाने जसे मारुतीस चिरंजीव केले, तसे मुक्ताबाईस निवृत्तिनाथांनी चिरंजीव केले.
१०. मुक्ताबाईचा देह प्रलयापर्यंत चिरंजीव आहे
याच मुक्ताबाईची काळजी ज्ञानदेव, सोपान, चांगदेव, नामदेव, उद्धवादी भक्तांना पडली होती. म्हणून उद्धवाला राहावले नाही. तर त्यांनी पांडुरंगाला विचारले की, ‘मुक्ताबाईची गती काय ? कसे काय करायचे ?’ त्यावर पांडुरंगांनी उत्तर दिले की, ‘मुक्ताबाई निर्विकार आहे. लग्नाची गरज नाही. “मुक्ताबाई निर्विकार जाण साचार उद्धवा” ती काही सामान्य मुलगी नाही.’ यावर उद्धव म्हणाले की, ‘अहो, मी लग्नाचे विचारीत नाही. तर त्यांच्या देहाविषयी प्रश्न केला आहे.’ त्यावर भगवान म्हणाले, ‘उद्धवा, तू प्रेमाने विचारले म्हणून सांगतो. अरे, निवृत्तिनाथांनी मुक्ताबाईंच्या डोक्यावर अभयहस्त ठेवून तिला चिरंजीव केले आहे, हे तुला माहिती नाही काय ? तिचा देह सत्यसनातन असून महाप्रलयापर्यंत चिरकाळ नित्य निरंतर राहून त्याला कोणतीच विकृती होणार नाही. त्यांचा षड्विकाररहित देह आहे.’ मुक्ताबाई ब्राह्मणी साचार। जाण निर्विकार उद्धवा । असे भगवान उद्धवास सांगतात.
उद्धवें चरणावरि ठेवोनि माथा । एक विनंती परिसावी जगन्नाथा । गुज अंतरीचे सांगा समर्था । कृपावंत स्वामिया ॥ ३ ॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपानाशीं । तिघां बैसविलें समाधीशीं ।
मुक्ताबाईची स्थिती कैसी । ती सांगावी स्वामिया ॥ ४ ॥
म्हणे विठोजी तू काय नेणशी । प्रीती करूनी आम्हां पुसशी । तरी ऐका मुक्ताईची स्थिती ऐशी । ऐसें उघड तुजशीं बोलतो ॥ ५ ॥
निवृत्तीचा कर अभय शिरीं । सत्यसनातन निर्धारीं ।
महाकल्पाच्या अंतावरी । देह अवसरीं ठेविला ॥ ६ ॥
तंववरी बाईचें शरीर । चिरकाळ नित्य निरंतर । मुक्ताबाई ब्राह्मणी साचार । जाण निर्विकार उद्भवा ॥ ७ ॥
मुक्ताबाईची समाधी कशी व कोणत्या रूपाची आहे याविषयी एकनाथ महाराजांचा अभंग आहे. मुक्ताबाईचे शरीर महाप्रलयापर्यंत चिरंजीव आहे. म्हणजे कोठे भुयारात जाऊन बसल्या नाहीत. आकाशात निघून गेल्या नाहीत, पाण्यात विलीन झाल्या नाहीत तर नाथ मंडळीमध्ये समाधिरहित – समाधी न घेता नित्य विदेहकैवल्यरूपता म्हणजे देहात असून देहधर्मरहित असणे, तसेच बंधनसापेक्ष मुक्ता नसून स्वभावतःच मुक्त हेच त्यांचे नाव असून महाकल्पापर्यंत त्यांचे शरीर चिरंजीव आहे, असा नाथांचा अभंग आहे.
नाथाचे आश्रमीं समाधिरहित । मुक्तता मुक्त नाम तुम्हां ॥ १ ॥ महाकल्पावरी चिरंजीव शरीर । कीर्ती चराचर त्रिभुवनीं ।॥ २ ॥ आनंदें समाधी सदा ती उघडी । नामस्मरण घडोघडीं मुखोद्गत ।। ३ ।। एका जनार्दनीं नाम तुमचें गोड । त्रैलोकीं उघड नाम कीर्ती ॥ ४ ॥
(ए. गा. ३५४३)
हेच गुह्य व हाच एकांताचा विषय गंगाधारेवरील निवृत्ती व मुक्ताबाईचा होता. पण भगवंतांनी तो उघड करूनच सांगितला. मुक्ताबाई चिरंजीव असून आजही दर्शन देतात.
११. समाधिस्नान
मुक्ताबाईस निवृत्तिनाथांनी चिरंजीवत्वाचा आशीर्वाद दिला. पण मुक्ताबाईला वाटत होते आता स्थूल देहाने लोकांना न दिसता गुप्त रूपाने राहावे. आपल्या या देहाचा तिरोभाव केला पाहिजे. म्हणजे निवृत्तिनाथ पुढे समाधी घेण्यास मोकळे होतील, म्हणून अदृश्य झाले पाहिजे. त्याकरिता काय केले पाहिजे, हे ठरवून समाधीच्या अगोदर जसे सर्वांनी स्नान करून नंतर समाध्या घेतल्या, तसे आपणही स्नान करून नंतर गुप्त होऊ. म्हणून स्नानास तापी नदीवर जाण्याचे
ठरविले. ही भक्त मंडळी दशमीला दुपारी १२ वाजता निघाली. टाळ, मृदुंग, वीणा, पताका, गरुडटके अशा सर्व प्रकारांनी दिंडी काढून भजन करीत, मोठ्याने रामकृष्णहरी व पुंडलिक वरदेचा जयघोष करीत, गर्जना करीत, ही दिंडी चांगदेवला तापी पूर्णा (पयोष्णी) संगमावर आली. सर्वांनी स्नाने केली. मुक्ताबाईला निवृत्तिनाथांनी स्नान घातले. हे शेवटचे स्नान आहे, हे निवृत्तिनाथ जाणून होते. म्हणून आपल्या हाताने मुक्ताबाईवर उदकसिंचन केले. माझ्या बहिणीला कोण न्हाऊ माखू घालणार ? म्हणून आपणच डोक्यावर पाणी टाकले, तर सोबत राही रखुमाई, सत्याभामा होत्याच. त्या धावून आल्या. त्यांनीसुद्धा मुक्ताबाईस मंगलस्नान घातले. ज्ञानेश्वर, सोपान, चांगदेव, वटेश्वर यांना जसे समाधी घेण्याच्या अगोदर मंगलस्नान घातले होते, तसेच हे शके १२१९ वैशाख वद्य दशमीस माध्यान्हास तापीपूर्णांच्या संगमावर मुक्ताबाईस मंगलस्नान घातले. तेव्हा स्नान करून मुक्ताबाईने सर्व पांढरी वस्त्रे परिधान केली. स्नानानंतर बाहेर निघून मुक्ताबाईंनी पांडुरंगाचे, रुक्मिणीचे व निवृत्तिनाथांचे दर्शन घेऊन तीर्थ घेतले व ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर, सोपान, चांगदेव यांनी समाधीला बसण्याच्या अगोदर नमन केले. तसेच मुक्ताबाईंनी सुद्धा गुप्त होण्याच्या अगोदर पांडुरंगाची स्तुतिरूप मंगल केले ते असे.
देवा । तूं विसावा जीवशिवा । मुक्ताई म्हणे गुण गौरवा अनुभवा । आम्ही जाणों तुज ॥ १ ॥
१२. मुक्ताबाईचे नमन
सत्य सत्य जनार्दन । सत्य सत्य नारायण । सत्य सत्य तूं आमुचें धन । जगज्जीवन जगदाकार ॥ २ ॥
तुजवांचोनी त्रिभुवनीं । दुजा न देखों नायकों कानीं । वेदशास्त्र पुराणीं । अगाध महिमा तुझा ॥ ३ ॥
तूं देवाधिदेवो शंकराचा उत्तम । तूं निज भक्तांचा विश्राम । आत्माराम । ऐसा नेम वेदाचा ॥ ४ ॥
तरी भक्तांचा कोंवसा । पावसी तूं हृषीकेशा ।
नाहीं तुजवीण भरंवसा ।
निश्चय तूं परत्रीचें तुझ्या चिंतनें साच तूं ॥ ५ ॥ ऐसा तारू । तुझा आगम निगम विचारू । पारू । उतरे संसारू दुर्घट ॥ ६ ॥ ठायीं । विठोजी म्हणे मुक्ताबाई । मन समर्पिलें माझे तयासी जन्म मरण नाहीं । सत्य पाहीं निर्धारें ।॥ ७ ॥ नामा म्हणे करुनी स्तुती । मुक्ताबाई चरण वंदिती । तंव संत महंता विनविती । आदिमूर्ती विष्णूची ॥ ८ ॥
४५६
श्री मुक्ताबाई चरित्र व गाथा
१३. बैसले बाहेरी
(ना. गा. १०२७)
असे मुक्ताबाईने नमन केले व तेथून बाहेर निघाले. तितक्यात फार आभाळ उठले. विजा चमकू लागल्या. ढग वरचेवर माथ्यावर येऊ लागले. प्रलयकालच्या विजांचा गडगडाट सुरू झाला. सोसाट्याचा वारा सुटला. त्यावेळी ही मंडळी तापीत नव्हती हे निश्चित आहे. कारण ‘करूनिया स्नान बैसले बाहेरी’ या बाहेर शब्दाने किती बाहेर घ्यावयाचे हा प्रश्न आहे. बाहेर या शब्दाने आपल्या नित्याच्या ठिकाणी येऊन बसले असे मानणे बरे, कारण मुक्ताबाई कोठे विसर्जिली तर ‘मार्कंडेयें येथे तप केलें.’ येथे म्हणजे कोठे तर जेथे मुक्ताबाई विसर्जिली तेथे. तसेच ‘तेथे परशुरामें मारियेला बाण’ तेथे म्हणजे कोठे तर जेथे मुक्ताबाई गुप्त झाली तेथे, असा संबंध घ्यावा. याच परशुराम तीर्थाला-बाणगंगा, परशगंगा, गंगाधार, परशुराम तीर्थ अशी नावे आहेत.
काही शंका करतात की, मुक्ताबाई कोठे विसर्जिली हे नामदेवादी संतांनाही माहीत नाही. यांस ‘कोठे मुक्ताबाई विसर्जिली’ हे प्रमाण देतात. पण यास उत्तर तेथेच अभंगात आहे की, ‘मार्कंडेयें जेथे तप केलें’ जेथे परशुरामें मारियेला बाण.” असे स्थलवाचक शब्द असता, स्थान सांगितले नाही है शंकाकारांचे म्हणणे बरोबर नाही. आता शंका एवढीच आहे की, तापीच्या बाहेर बसले ते बाहेर म्हणजे कोठे ? सुंदर नगर जेथे चांगदेव आहे तेथे किंवा
गंगाधार बाहेर शब्दाचा अर्थ करावा, तर वरचे ‘जेथे तेथे’ हे शब्द वापरल्यावरून व ‘पश्चिमे परशुरामे मारियेला बाण, हे लागण्याकरता गंगाधारेच्या पूर्वेला जेथे मार्कंडेय राहण्याचे ठिकाण होते तेथे धावत येऊन बसले असे मानावे. असे जर मानले नाही, तर मार्कंडेयें जेथें तप केलें व तेथे परशुरामानें मारियेला बाण व ‘पाहती पुरातन पश्चिमेस’ या सर्व प्रमाणांची वाटच लागणार नाही. म्हणून बाहेरचा अर्थ थोडा व्यापक करणे बरे. या ठिकाणावर जाऊन बसण्याच्या धांदलीत कोणाचीच शुद्धी कोणाला राहिली नाही. कोणी आहे की तापीतच राहिले, कोण कोणाला पाहतो ? ज्याचा त्याचा जीव ज्याला त्याला भारी झाला होता, त्यातही सर्व धूळच धूळ झाली होती. सूर्यावर गडद आभाळ आल्यामुळे अंधारही पडला होता.
१४. झाली मुक्ताबाई स्वरूपाकार
प्रळयींच्या विजा वर्षती अपार । झाला धुंधकार दाही दिशा ।। २ ।। झुंझाट सुटला वारा कांपूं लागे धरा । नभची अंतरा कालवलें ॥ ४ ॥ नामा म्हणे देवा झाली कैसी गती। पडलीसे भ्रांती अवघ्या जनां ।॥ ५ ॥ निवृत्तिराज म्हणे प्रळयींचा वारा। सुटला शारंगधरा ऐसे वाटे ॥ १ ॥
(ना. गा. ११८५, ८६)
बरे, यांना बाहेर म्हणजे गंगाधारेवर जाणे अवघड नव्हते. कारण त्यांच्या जवळ विमाने होती.
हालतें गगन डोलती विमानें। गेलें देहभान अवघियांचे ॥ २ ॥
अवघियांचे डोळे झांकले एकदां । माध्यान्हीं अंबुदा वळुनी आले ।। ३ ।।
निवृत्ति पांडुरंग राही रखुमाई । धरा म्हणती घाई मुक्ताईला ।। ४ ।।
(ना. गा. ११८६)
सर्वच मंडळी वयाने वडील असून सर्वांत धाकटी मुक्ताबाई. तिचेच रक्षण करणे सर्वांचेच कर्तव्य होते. म्हणून निवृत्तिनाथ, पांडुरंग, रुक्माबाईला म्हणू लागले की, मुक्ताबाईला लवकर धरा, उडून जाईल.
झाली मुक्ताबाई स्वरूपाकार
‘देवा, अहो, ही असे जो तो म्हणू लागला. पण नामदेवराय म्हणतात – धूळ व वादळ काही केल्या डोळेच उघडू देत नाही.’ त्यावर ऋषी म्हणाले की, हे विघ्नच आले आहे. आता यातून जगणेच कठीण आहे. कोणाचीच शुद्धी कोणालाच राहिली नाही. सर्व म्हणू लागले की, नारायणा, आता सर्वांनाच मरण आले आहे असे दिसते. असे म्हणत असता, निरंजनामध्ये मोठ्याने वीज कडकडाट करून गर्जली व त्याबरोबर मुक्ताबाई गुप्त झाली. चित्कला चिद्रूप झाली, मुक्ताबाई अदृश्य झाली, तेव्हा एक सारखा प्रहरभर लख्ख उजेड पडला होता व वैकुंठात १ लाख घंटा वाजत होत्या.
ऋषी म्हणती हरी पातलेंसे विघ्न । आतां कैसे प्राण वांचतील ॥ १ ॥ कोणाचिया शुद्धी नाहींचिया कोणा । म्हणती नारायणा मृत्यू आला ।। २ ।। कडाडली वीज निरंजनी जेव्हां । मुक्ताबाई जेव्हां गुप्त झाली ।॥ ३ ॥ वैकुंठीं लक्षघंटा वाजती एकघाई । झाली मुक्ताबाई स्वरूपाकार ।। ४ ।। एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनीं । जेव्हा निरंजनी गुप्त झाली ।। ५ ॥ गेलें निवारुनी आभाळ आभूट । नामा म्हणे कोठें मुक्ताबाई ।॥ ६ ॥
(ना. गा. ११८७)
१५. जेव्हा निरंजनी गुप्त झाली
आकाशात वीज कडाडली असे न म्हणता निरंजनी वीज कडाडली असे म्हटले. निरंजन याचा अर्थ- मुक्ताबाई नाथपंथी होत्या. त्यांचे तत्त्वबीज निरंजन आहे. ते भिक्षा मागताना ‘अलख निरंजन’ म्हणतात. अलक्ष ही पाचवी मुद्रा आहे. “मुद्रा ती पाचवी लावुनिया लक्ष। तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे।” किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, ‘अलक्ष लक्ष मी लक्षी, तसे अलक्ष जे निरंजन ब्रह्म यालाच निरंजन मैदान म्हणतात.’ “चल निरंजन जल जंगल के जीवडे” म्हटले आहे. ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत असतानाही निरंजनाच्या मैदानात त्यांनी प्रवेश करूनच पूर्ण ब्रह्म झाले, असा उल्लेख आहे. भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान। झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव ॥ ७ ॥ तसेच येथे मुक्ताबाईच्या समाधीच्या
अभंगातही ‘निरंजनी वीज कडाडली’ असे निरंजनी म्हटले आहे. निरंजनी याचा अर्थ चिदाकाश रूप जे ब्रह्म त्यात स्फुरण होऊन जो लख्ख प्रकाश पडला, त्यात ब्रह्म चित्कला म्हणजे ब्रह्माचा ज्ञानरूप जो प्रकाश, अशी मुक्ताबाई ज्योतीत ज्योत, प्रकाशात प्रकाश सामावला. निरंजनी तेव्हा गुप्त झाली. निरंजन शब्द येथे ब्रह्माचा वाचक आहे. असा पुष्कळ ठिकाणी निरंजन शब्द आला आहे. त्या ब्रह्मात मुक्ताबाईंची तनू ब्रह्म झाली. म्हणजे ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनू। ज्ञानेश्वर म्हणतात की, “सदेह सच्चिदानंद का नोहावे ते” “तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ” तुकोबाही म्हणतात “होय अंग हरीरूप” “ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी” म्हणजे जसा भगवान श्रीकृष्णांचा देह लीलाविग्रह होता. स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपि ॥ तसा मुक्ताबाईचा देह स्वेच्छामय म्हणजे आपल्या इच्छेने विग्रहवान झाल्या व इच्छेप्रमाणेच निरंजन रूप म्हणजे ब्रह्मरूप देह होणे मुक्ताबाईस शक्य आहे. कारण मुळातच ती ‘अघटितघटनापटीयसी मायाशक्ति’ आहे. अशी ती मुक्ताबाई म्हणजे ‘मूळ माया’, ‘आदिशक्ति ब्रह्म चित्कला’, ‘ज्ञानदीप्तिकळा’ आहे. ती स्थूलदृष्ट्या ब्रह्मलीन झाली.
शके १२१९ हेमलंबीनाम संवत्सर वैशाख वद्य १० मी. तारीख १९-५- १२९९ दुपारी १ वा. १५ मि. या समई स्वरूपाकार झाली. त्या दिवशी आपण मुक्ताबाईची पुण्यतिथी करतो. वास्तविक त्या, त्याच देहाने नित्य चिरंजीव आहेत, तरी पण व्यवहाराला धरून त्यांचा तिरोभाव मानला व त्या दृष्टीने त्यांच्या गुप्त होण्याच्या समयी वैकुंठात लक्ष घंटा वाजू लागल्या. जेव्हा मुक्ताबाई गुप्त झाल्या, ती वेळ सरासरी दिवसाचे एक वाजताची असावी. कारण स्नान करून माध्यान्हाला निघाले असे वर्णन आहे. ‘माध्यान्हा अंबुद वळूनी आले.’ व त्याचवेळी आईसाहेब गुप्त झाल्या. आईसाहेब गुप्त झाल्यावर एक प्रहराने ढग वगैरे निघून जाऊन, आकाश स्वच्छ निरभ्र होऊन वाराही शांत झाला. सरासरी ते वादळ २.३० वाजता थांबले असेल. तेव्हा संतमंडळी मुक्ताबाईचा शोध करू लागली. दिशा स्वच्छ झाल्या. सूर्यनारायणाचे मुखही पाहिले. पण मुक्ताबाईचा पत्ता कुठे आहे ?
मुक्ताबाई मुक्त केली केशवराजें ।।
मुक्ताबाईंनीच योगमायेने आभाळ तयार केले. हे निवृत्तिराजांना माहीत होते. कारण एकांतात जेव्हा गुप्त होण्याविषयी चर्चा झाली होती, तेव्हाच मुक्ताबाईने सांगून ठेवले होते की, असा प्रकार घडेल व मी त्यात गुप्त होईन, पण हे तोपर्यंत कोणास सांगू नका.
१६. मुक्ताबाईंविषयी शोक
काही झाले तरी ते भगिनीप्रेम आवरले नाही. निवृत्तिनाथांना फार दुःख झाले. कारण मुक्ताबाई काही सामान्य नव्हत्या. ज्या मुक्ताबाईकरिता निवृत्तिनाथ थांबून राहिले होते, त्या उभ्या उभ्या निघून गेल्या. जेव्हा मुक्ताबाई गुप्त झाल्या. तेव्हा सर्व भक्तमंडळींनी ‘मुक्ताबाईचा जयजयकार असो !’ ‘मुक्ताबाई की जय’ अशा मोठ्याने गर्जना केल्या व गुलाल उधळून टाळ्या वाजविल्या. गोपाळ व भक्त नाचू लागले. सर्वांच्या समाध्यांपेक्षा मुक्ताबाईंची समाधी अलौकिक झाली. हे पाहून सर्वांना आनंद झाला, पण त्याचबरोबर मुक्ताबाईच्या विरहाचे दुःखही अती झाले की, मुक्ताबाई गुप्त होताना आम्ही पाहिली नाही व बोलूनही गेली नाही. आताच गुप्त होईल असे वाटत नव्हते. त्यामुळे डोळे भरून पाहूनही घेतले नाही. तोंड भरून बोललो नाही. असा नाना प्रकारचा खेद निवृत्तिनाथ व सर्वच संत करू लागले व डोळ्यांना पदर लावून रडू लागले.
नामदेव महाराज म्हणाले की, ‘हे कसे काय झाले की, मुक्ताबाई आम्हांस बोलली सुद्धा नाही. ज्ञानेश्वर, सोपान यांची बोलून चालून बोळवण केली. तो सर्व सोहळा आम्ही डोळ्यांनी पाहिला. चांगोबाचाही समाधी सोहळा डोळे भरून पाहिला. पण मुक्ताबाई जशी होती की नाही असेच झाले.’ असे म्हणून सर्व स्फुंदून स्फुंदून रडू लागले.
१७. राहिले एक मास
नंतर पुढे ते संत तेथे रमणीय स्थळ होते, म्हणून एक महिनाभर राहिले. याचा अर्थ मुक्ताबाई गुप्त झाल्यानंतर पुढे फक्त पंधराच दिवस राहिले असा करावा लागेल. कारण मुक्ताबाईची समाधी वैशाख वद्य १० मी व पुढे ज्येष्ठ
वद्य प्रतिपदा ते तृतीया तीन दिवस सप्तशृंगीला उत्सव केला व पंचवटीला ज्येष्ठ
वद्य पंचमीला पोहोचले. तेथे नवमीपर्यंत राहिले असे अभंगात आहे. ज्योष्ठ बड़ा पक्ष सर्व प्रवासातच दाखविला आहे. तर ते तापी तीरावर ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेपर्यंतच थांबले, असे मानले पाहिजे व अभंगातही अर्ध ज्येष्ठ सांगितला आहे.
रम्य स्थळ म्हणोनि राहिले एक मास । युगा ऐसे दिवस क्रमियेले ।। ४ ।। अर्थमास वैशाख अर्थ मास ज्येष्ठ । थोर होती कष्ट निवृत्तिराजा ।। ५ ।। पंचमीचे दिवशीं गेले पंचवटी । उतरले तटीं गोमतीचे ॥ ६ ॥
(ना. गा. ११८९,९९)
तसेच दुसऱ्या अभंगात सप्तशृंगीला तीन दिवस राहिले. यावरून असे सिद्ध होते की, पंधरा दिवस मुक्ताबाई गुप्त झाल्यानंतर तापी तीरावर राहिले असतील. म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेपर्यंतचा काल तापी तीरावरच गेला व ज्येष्ठ वद्य प्रतिपदा ते तृतीया सप्तशृंगीवर गेले व ज्येष्ठ वद्य पंचमीला जर हे पंचवटीला गेले तर अवघ्या पाचच दिवसात शंभर कोस गेले, म्हणजे रोज वीस कोस चालून गेले असे होते.
मुक्ताबाईला केशवाने मुक्त केल्यावर नामदेव म्हणतात की, आता तापीची पूजा करा. नंतर जेथे उतरले होते, त्या सोमेश्वराची पूजा करून पुढे जाते झाले. तेथून निघत असताना निवृत्तिनाथांना मुक्ताबाईविषयी गहिवर आला. मुक्ताबाईंचे आमच्यावर काहीच ओझे पडले नाही. समाधी उकरावी लागली नाही. पूजा साहित्य गोळा करावे लागले नाही. पूजा उपचारांचा त्रास पडला नाही. शास्त्रविधी धुंडत बसावे लागले नाही. मुक्ताबाईचे कसे करावे सर्वांनाच वाटत होते. पण मुक्ताबाईने तीळभरही कष्ट होऊ दिले नाही. असे म्हणून निवृत्तिनाथ फार विलाप करू लागले, मुक्ताबाई कशी आली, कशी गेली काहीच कळले नाही. याप्रमाणे निवृत्ती शोक करू लागले, तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, ‘देवा, निवृत्तीचे समाधान करा. तेव्हा देवाने निवृत्तीचे समाधान केले.’
(माहिती सदरील माहिती – ह भ प निवृत्ती महाराज वक्ते यांचे “ब्रम्हचित्कला दर्शन अर्थात श्री मुक्ताबाई चरित्र व गाथा” या ग्रंथातून जशीच्या तशी घेतली आहे. या ग्रंथांत यापेक्षाही रोमांचकारी माहिती असून आपल्या घरात हा ग्रंथ संग्रही ठेवल्यास तुम्हाला संत व मुक्ताई तसेच मुक्ताईनगर इसवि सन पूर्ण पूर्ण ज्ञान होईल ) जय मुक्ताई