मन सुन्न करणारी घटना! मयुरी ठोसर आत्महत्या प्रकरणी सोनार समाजाचा ‘कठोर कारवाई’साठी एल्गार; मुक्ताईनगर येथे प्रशासनाला निवेदन
मुक्ताईनगर प्रतिनिधी/विशेष वृत्त:
जळगाव जिल्ह्यातील सुंदर मोतीनगर येथे मयुरी गौरव ठोसर (वय २३) या नवविवाहित तरुणीने केलेल्या आत्महत्येच्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सोनार समाज हादरला आहे. लग्नाला अवघे चार महिने झाले असताना सासरच्या मंडळींकडून झालेल्या अत्याचार, मानसिक छळ आणि सततच्या त्रासाला कंटाळून मयुरीने आपले जीवन संपवले. या संतापजनक घटनेप्रकरणी आरोपींवर तातडीने आणि कठोरतम कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सर्व सोनार समाज मुक्ताईनगर यांनी आज प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केले.
चार महिन्यांत संसाराची राखरांगोळी
दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने समाजातील स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. मयुरीला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर कोणतीही हलकी कारवाई न होता, उदाहरणादाखल शिक्षा व्हावी, अशी मागणी निवेदनात स्पष्टपणे करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, या प्रकरणातील आरोपी म्हणून पती – गौरव ठोसर, जेठ – गणेश किशोर ठोसर, सासरे – किशोर ठोसर आणि सासू – लता किशोर ठोसर यांची नावे नमूद आहेत.
“लग्नाच्या मंडपातून डोळे भरून सासरी गेलेल्या एका निष्पाप मुलीच्या स्वप्नांचा आणि संसाराचा चार महिन्यांतच असा क्रूर अंत व्हावा, ही अतिशय वेदनादायक बाब आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय समाजातील या वाईट प्रवृत्तींना आळा बसणार नाही,” अशी तीव्र भावना समाज बांधवांनी व्यक्त केली.
जामीन नाकारण्याची आणि पोलिस चौकशीची मागणी
सोनार समाजाने प्रशासनाला विनंती केली आहे की, या गंभीर गुन्ह्यातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात यावा. तसेच, या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने सामाजिक जनजागृती मोहीम राबवावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी सोनार समाजाच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. मानव अधिकार संघटना आणि महिला अपराध नियंत्रण संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मोहन मेढे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती, त्यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली.
निवेदन देते वेळी प्रवीण शुरपाटणे, प्रकाश सोनार, वैभव सोनार, गजानन सोनार, श्रीकृष्ण रत्नपारखी, अशोक तळेकार, सचिन शूरपाटणे, अनिल शूरपाटने, शुभम तळेकार, योगेश बुडुखले, यांच्यासह वैष्णवी रत्नपारखी, संगीता उज्जैनकर, रूपाली हिरडकर, कल्पना इटणारे, ललिता बुडूखले, पोर्णिमा सोनार व आदी महिला-पुरुष सोनार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनाही पाठवण्यात आली असून, या प्रकरणी तातडीने व कठोर कार्यवाही होण्याची अपेक्षा संपूर्ण समाजातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
मयुरीला न्याय मिळणार का? कठोर शिक्षेमुळे समाजाला योग्य संदेश जाईल का?