लग्नाच्या तोंडावर दादा शहीद, सहकारी जवानांनी भावाचं कर्तव्य बजावलं!
शिमला: हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील अंजि-भोज येथील भारली गावात नुकताच दुःख आणि आनंद यांचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. बहिणीच्या लग्नाआधी अवघ्या महिनाभरावर शहीद ग्रेनेडियर आशिष कुमार यांना वीरमरण आले होते, पण त्यांच्या रेजिमेंटमधील सहकारी जवानांनी पुढे येऊन भावाचं कर्तव्य निभावलं आणि नववधूला दादाची कमतरता जाणवू दिली नाही.
१९ ग्रेनेडियर्स बटालियनचे शूर सैनिक आशिष कुमार हे २७ ऑगस्ट २०२४ रोजी अरुणाचल प्रदेशातील ‘ऑपरेशन अलर्ट’ दरम्यान शहीद झाले होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, विशेषतः जेव्हा घरात बहिणीचं लग्न होतं. मात्र, या दुःखाच्या क्षणी आशिष कुमार यांच्या रेजिमेंटमधील सैनिक आणि पाँटा साहिब व शिलाई येथील माजी सैनिकांनी संपूर्ण कुटुंबाला मोठा आधार दिला.
जवानांनी केली नववधूची पाठवणी
या विवाह सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या शहीद आशिष कुमार यांच्या सहकारी जवानांनी केवळ त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही, तर भावाची भूमिका घेत लग्नसोहळ्याच्या प्रत्येक क्षणात कुटुंबाला साथ दिली. एका बाजूला शहीद भावाच्या आठवणीने डोळ्यात अश्रू होते, तर दुसऱ्या बाजूला सहकारी जवानांनी भावाचं कर्तव्य बजावल्याने थोडा आनंद आणि सुरक्षिततेची भावना होती.
नववधूच्या पाठवणीच्या भावनिक क्षणी हे सर्व आजी-माजी सैनिक उपस्थित राहिले. त्यांनी वीरपत्नी, आई-वडील आणि विशेषतः नवरी मुलगी यांना आधार दिला, जणू आशिष कुमार स्वतः उपस्थित राहून बहिणीची पाठवणी करत आहेत. भारतीय सैनिकांनी फक्त देशाशीच नव्हे, तर आपल्या शहीद सहकाऱ्याच्या कुटुंबांप्रती असलेल्या वचनबद्धतेचं हे एक हृदयस्पर्शी उदाहरण होतं.
”दादाची आठवण काढत…”: नववधूचे भावनिक उद्गार
या अत्यंत भावनिक सोहळ्यानंतर नववधू आराधना हिने आपल्या दिवंगत भावाची आठवण काढत आणि सहकारी जवानांचे आभार मानत आपले मन मोकळं केलं. आराधना रडत म्हणाली, “दादा आज आमच्यासोबत नाहीत याचं खूप दुःख आहे, पण त्यांच्या मित्रांनी (सहकारी जवानांनी) जो आधार दिला, भावाचं कर्तव्य पार पाडलं, त्यामुळे मला दादाची कमी भासू दिली नाही. मी त्यांचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. मला अभिमान आहे की माझा दादा देशासाठी शहीद झाला आणि त्याचे मित्र माझ्या पाठीशी उभे राहिले.”
शहीद आशिष कुमार यांच्या कुटुंबीयांनीही या सर्व आजी-माजी सैनिकांचे आभार मानले. हा विवाह सोहळा केवळ एक लग्न नव्हता, तर भारतीय सैन्यातील अतूट बंध आणि माणुसकीचं एक भावनिक दर्शन होतं, ज्यामुळे अनेकांचे डोळे पाणावले.