मुक्ताईच्या दारात… निष्ठा आणि उपेक्षा!
मुक्ताईनगर, (जळगाव): राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरच्या भूमीवर आपली श्रद्धा पुन्हा एकदा सिद्ध केली. संत मुक्ताई यांच्या आषाढी पालखी सोहळ्याप्रसंगी तब्बल सहा वेळा दर्शन घेऊन त्यांनी आपली भक्ती आणि हिंदू धर्मावरील निस्सीम श्रद्धा दाखवून दिली. दुसरीकडे, याच मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मात्र संत मुक्ताई मंदिराला बगल देत थेट विश्रांतीचा मार्ग निवडला, ज्यामुळे त्यांच्या पक्षावर होणारे ‘नास्तिकतेचे’ आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
एकनाथ शिंदेंची मुक्ताई चरणी निष्ठा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरच्या दौऱ्यात संत मुक्ताई यांच्याबद्दलचा लडिवाळ भाव पुन्हा एकदा दाखवून दिला. यंदा आषाढी पालखी सोहळ्याच्या मुक्ताईनगर येथील प्रस्थान आणि पंढरपूर येथील आगमन सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले. त्यांचा हा वारकरी संप्रदायाप्रती असलेला आदर आणि श्रद्धा हिंदू धर्मावरील त्यांची निष्ठा अधोरेखित करते. वारकरी संप्रदायाच्या मानाच्या आणि चौथ्या धाम मानल्या जाणाऱ्या मुक्ताईच्या दर्शनासाठी त्यांनी एक नाही तर तब्बल ६ वेळा वेळ दिला, ही बाब स्थानिक जनतेमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये कौतुकाचा विषय ठरली आहे.
शशिकांत शिंदे यांची उपेक्षा, वारकऱ्यांमध्ये रोष
याच दिवशी मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवर पक्षाची बैठक घेतली. याचवेळी ॲडव्होकेट रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी त्यांना संत मुक्ताईचे दर्शन घेण्यासह, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. मात्र, शशिकांत शिंदे यांनी हे निमंत्रण स्वीकारले नाही. त्याऐवजी त्यांनी मुक्ताईच्या दर्शनाला बगल देत थेट जळगावकडे प्रयाण केले.
ही घटना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर होणाऱ्या नास्तिकतेच्या आरोपांना पुष्टी देणारी ठरली आहे. चार पिढ्या ज्या पक्षासाठी झटल्या, त्याच निष्ठावंत कार्यकर्त्याच्या कुटुंबातील कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्षांनी बगल दिल्याने वारकरी संप्रदायात आणि भाऊसाहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली हिंदू धर्म आणि संतांप्रतीची श्रद्धा कृतीतून दाखवून दिली असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या दुर्लक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोन वेगवेगळ्या भूमिकांनी राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेमध्ये अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.