जगातील सर्वात सुंदर व आदर्श राज्यघटना म्हणजे भारतीय संविधान ; संविधानानेच देशाची प्रगती– ॲड.मनोहर खैरनार
मुक्ताईनगर — जगातील सर्वात सुंदर व आदर्श राज्यघटना म्हणजे भारतीय संविधान हे होय. संविधानानेच देशाची प्रगती झाली असून आज संविधानाच्या मुळावर घाव घालण्याचे प्रकार सुरू आहेत. असे घडल्यास लोकशाही धोक्यात येऊन राष्ट्राच्या प्रगतीत अडथळे निर्माण होऊन राष्ट्राचे अस्तित्वच धोक्यात येईल.त्यामुळे संविधान व पर्यायाने राष्ट्र वाचविण्याची जबाबदारी भावी पिढीवर असल्याचे प्रतिपादन ॲड.मनोहर खैरनार यांनी मुक्ताईनगर येथे केले.ॲड खैरनार हे मुक्ताईनगर येथील शासकीय तंत्र विद्यालय आयोजित संविधान मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक डी.पी.कोळी हे होते. तर चांगदेव हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय चौधरी तसेच संत मुक्ताई पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद बोदडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना ॲड.खैरनार म्हणाले की, भारतीय संविधान हा एक आदर्श राष्ट्रीयग्रंथ असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच आदर्श नागरिक घडविण्याचे उत्तम आचारसंहिता आहे.ज्या माध्यमातून गेल्या 75 वर्षापासून भारत देश प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे.विविध जाती धर्म वंश परंपरा भाषा यांना एकत्रित गुंफण्याचे काम केवळ राज्यघटनेमुळे शक्य झाले आहे. परंतु आज भारतीय राज्यघटनेच्या मुळाशी घाव घालण्याचे प्रयत्न सुरू आहे , ही बाब देशाच्या हिताची नसून देशाला महासत्ता होण्यापासून रोखण्याचे षडयंत्र आहे. हे वेळीच हाणून पाडण्याची गरज आहे. हे न झाल्यास दूरगामी परिणाम भोगावे लागणार. त्यासाठी भारतीय संविधान अधिक मजबूत होण्याची गरज आहे. … अन्यथा स्वतंत्र भारताचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा इशाराही ॲड.खैरनार यांनी दिला. याप्रसंगी चांगदेव विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय चौधरी यांनी संविधानाची उद्देशिका हा संपूर्ण राज्यघटनेचा गाभा असल्याचे सांगितले तर शरद बोदडे यांनी संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा असल्याचे सांगितले. शेवटी प्राध्यापक सूचना डी.पी. कोळी यांनी अध्यक्षीय भाषण केले. श्री.कोळी यांनी प्रत्येक नागरीकाने संविधानाचा आदर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रम प्राचार्य एम एस राजपूत मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय तंत्र विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक नितेश शिरभाते, जोंधनखेडा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे गणेश लिपिक फकीरचंद पिंप्राळे भांडार लिपिक भाग्येश चौधरी निदेशक महेश बोरोले सुभाष मराठे हुसेन शेख कर्मचारी शांताराम ढाके नरेंद्र कुमार तसेच मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थ कृष्णकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद बोदडे यांनी केले आभार फकीरचंद पिंपराळे यांनी मानले.