वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षांना राखी बांधून साजरी केली अनोखी रक्षाबंधन !
• वृक्ष रक्षाबंधन: कोथळी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
• वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ ।।
येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत।। 1 ।।
आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे मन क्रिडा करी।। 2 ।।
कंथा, कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरु।। 3 ।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार। करोनि प्रकार सेवु रुची।। 4 ।।
तुका म्हणे होय मनासी संवादु। आपलासी वाद आपणासी।। 5 ।।
या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या उक्ती प्रमाणे,
-भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णीमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणी बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात . नेमका हाच संदेश वापरून कै गणपतराव खडसे आश्रम शाळा कोथळी येथील विद्यार्थीनिंनी शाळेतील स्वतः लागवड व संवर्धन केलेल्या वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली .वसतिगृह अधिक्षिका पुनम पाटील यांच्या संकल्पनेतून, मुख्याध्यापक राजेश पाटील,रविंद्र राणे यांच्या मार्गदर्शनात हा आगळा वेगळा उपक्रम राबवुन वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला .या प्रसंगी आशा भिलाला,रमा बारेला,ललिता बारेला,किशोरी सोळंके,अनिता सोलकी, लक्ष्मी भिलाला,शिला बारेला यांनी सदर उपक्रमात सहभाग घेतला.
सर्वत्र होणाऱ्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला परिणामी ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न जागतिक समस्या बनली .यावर उपाय म्हणुन वृक्ष लागवडी सोबतच वृक्षसंवर्धनाची गरज ओळखुन कोथळी येथील आश्रमशाळेत शाळेत रक्षाबंधनाचा हा सण मागील अनेक वर्षापासून साजरा केला जातो त्यानुसार राखी पौर्णिमे निमीत्त परिसरातील वृक्षांना वृक्षरक्षा बंधन करण्यात आले . सदर उपक्रम केवळ औपचारिकता म्हणुन न राबविता वेळोवेळी या वृक्षांच्या सुरक्षीततेची खात्री करून व वेळ पडल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करण्याचा मानस सुद्धा शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला .वृक्ष रक्षाबंधनासाठी विद्यार्थींनी पर्यावरणाला हानीकारक असणार्यां घटकांना वगळुन स्वत:च्या हाताने तयार केलेल्या राख्यांचा वापर करुन वृक्ष रक्षाबंधन साजरे केले.