संत मुक्ताई पालखी सोहळा परतवारी,
तिर्थक्षेत्र मुक्ताईनगरीत जय्यत स्वागताची तयारी
• तीन गटांत स्पर्धा, पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीस
मुक्ताईनगर येथे १० ऑगस्टला वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धा
आदिशक्ती श्री संत मुक्ताई पालखी सोहळा आषाढी वारी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथून स्वगृही श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे दि.१० ऑगस्ट रोजी स्वगृही परतणार असून आईसाहेबांचा परतवारी जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात व्हावा यासाठी संत मुक्ताई पालखी आगमन सोहळा उत्सव समिती जय्यत तयारीला लागलेली असून पालखी मार्ग सजावट, स्वागत बॅनर, रांगोळी, भगवे ध्वज , पताका , महाप्रसाद , भव्य दिंडी स्पर्धा असे नियोजन तसेच या कार्यक्रमासाठी लोक सहभाग व्हावा या उद्देशाने दानशूर व्यक्तींकडून देणगी गोळा करणे अशा महत्वपूर्ण विषयासाठी संत मुक्ताई समाधी स्थळ कोथळी,तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर जि.जळगाव येथे दि.१ऑगस्ट २०२४ रोजी रात्री महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
सदरील बैठक संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पालखी सोहळा आगमन समिती च्या वतीने विविध समित्या तयार करण्यात आलेल्या आहे.
पहा व्हिडिओ ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी काय केले आवाहन .. YouTube Link Click Here
पहा व्हिडिओ ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी काय केले आवाहन .. Facebook Link Click Here
वाचा दि.१० ऑगस्ट रोजी कसे असेल नियोजन..
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेलेल्या संत मुक्ताई पालखी सोहळ्याने पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला आहे. ही वारी १० ऑगस्टला मुक्ताईनगर येथे परत येईल. याचे औचित्य साधून पालखी आगमन सोहळा समिती, संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताई वारकरी बहुउद्देशीय सेवा संस्थेने ‘वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धा आयोजित केली आहे. महिला, पुरुष व बाल वारकरी अशा तीन गटात सकाळी ९ वाजता ही स्पर्धा होईल. मुक्ताईनगर येथील गजानन सुरंगे यांच्याकडून पुरुष गटासाठी पहिले बक्षीस ११,१११, मोरगाव येथील
प्रल्हादराव पाटील यांच्याकडून दुसरे बक्षीस ७,७७७ आणि तिसरे बक्षीस नांदुरा येथील रामभाऊ झांबरे यांच्याकडून ५५५५ असे राहील. महिला गटासाठी मुक्ताईनगर येथील धनंजय एदलाबादकर यांच्याकडून ७,७७७, कै. चिंतामण उखडू पाटील यांच्या स्मरणार्थ गजानन पाटील (पिंपरी पंचम) यांच्याकडून दुसरे बक्षीस ५,५५५ तर मुक्ताईनगर येथील योगेश मनसुटे यांच्याकडून ३,३३३ चे तिसरे बक्षीस राहील. बाल गटासाठी गणेश अढाव, गणेश पाटील विटेकर व जांभुळधाबा येथील शशिकला सोनवणे यांच्याकडून अनुक्रमे ५,५५५ रुपये, ३,३३३ रुपये, २,२२२ रुपये अशी तीन बक्षिसे राहतील. आमदार चंद्रकांत पाटील यांचेकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल. नाव नोंदणीसाठी विनायक हरणे, उद्धव जुनारे यांच्याकडे संपर्क साधावा.
सहभागासाठी ८ ऑगस्टपर्यंत नोंदणी गरजेची
• बालगट, पुरुष व महिला स्पर्धकांनी दिंडी प्रमुख, सदस्यांच्या नावांसह इतर माहिती असलेला अर्ज भरून ८ ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी, नोंदणीवेळी १०० रुपये नाममात्र प्रवेश फी द्यावी लागेल.
• स्पर्धेवेळी दिंडीत बालगट, महिला गट व पुरुष गट आणि सर्वात शेवटी मुक्ताईंची पालखी असा क्रम राहील.
स्पर्धकांनी पारंपरिक पोशाखात सहभागी व्हावे. टाळ, मृदंग व विणा हे साहित्य सोबत आणावे.
• प्रत्येक दिंडीत २० किंवा त्यापेक्षा जास्त वारकरी असावेत. दिंडी स्पर्धेत ड्रेस कोड, शिस्त, रचना, सांप्रदायिक चाल, संतांचे अभंग, स्वर, ताल, पावली, ठेका या सर्व बाबींचे मूल्यमापन करून निवड होईल. • समान गुण मिळाल्यास बक्षीस विभागून मिळेल. या आधीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त मंडळांचा पुढील दोन वर्षे प्रथम क्रमांकासाठी विचार होणार नाही. समारोप कोथळीतील मंदिरात दुपारी १२ वाजता होईल.