अरेच्चा, चंद्रकांत पाटलांना ॲड. रोहिणी खडसे पाठवणार “बदाम”
*मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी तातडीने करावी अशी मागणी करीत ॲड. रोहिणी खडसे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना स्मरणपत्र आणि स्मरण शक्ती येण्यासाठी “बदाम” पाठवून आगळे वेगळे आंदोलन करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आलेले आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 9 फेब्रुवारी 2024 रोजी जळगाव येथे येत्या जुन महिन्यापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 पासुन ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा सर्व जाती, धर्म ,पंथातील उच्च शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थिनींना यापुढे कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नसल्याची घोषणा केली होती. यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी यासारख्या 800 अभ्यासक्रमांचा समावेश असेल असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले होते.
परंतु शैक्षणिक वर्ष 2024-25 ला सुरुवात झालेली असुन जुन महिना अर्धा उलटून सुद्धा चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे मुलींच्या मोफत शिक्षणाचा,फि माफीचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे विद्यार्थिनींना प्रवेशासाठी भरमसाठ फि भरावी लागत आहे.
म्हणुन चंद्रकांतदादांनी आपल्या घोषणेची आठवण करून देऊन शासनाला विद्यार्थिनींची फि माफीचा शासन आदेश निर्गमित करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या या चंद्रकांतदादा पाटील यांना विसर पडलेल्या घोषणेची लवकरात लवकर आठवण यावी यासाठी बुद्धी तल्लख होण्यासाठी पत्राबरोबर बदाम पाठवणार असून स्मरण शक्ती येण्यासाठी हे अनोखे आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.