नाडगाव ता. बोदवड रेल्वे गेट जवळ बांधण्यात आलेला रेल्वे उड्डाणपूल येत्या दोन दिवसात सुरु करा : अन्यथा आ.चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा
मुक्ताईनगर : बोदवड तालुक्यातील नाडगाव गावाजवळ रेल्वे गेट (रेल्वे क्रॉसिंग रुळ) आहे. त्यातच सदरील रेल्वे रुळावरून बऱ्याचश्या मालवाहू रेल्वेगाड्या, प्रवासी रेल्वेगाड्या येथून ये जा करीत असल्यामुळे सदरील रेल्वे रुळ इतर वाहतुकीला मुक्ताईनगर ते बोदवड व बोदवड ते मुक्ताईनगर येण्या जाण्यासाठी तासंतास बंद असतो. त्यातच या मार्गावर जागृत शिरसाळा हनुमान मंदिर असून दररोज हजारो लाखो भाविक येजा करीत असतात परंतु येथील रेल्वे फाटक तासंतास बंद असल्याने भाविक भक्तांना आणि इतर प्रवासी वाहतुकीला आतोनात त्रास सहन करावा लागतो. या करिता मागील काही वर्षांपूर्वी येथे उड्डाणपुलाचे काम मंजूर होऊन सदरील बांधकाम पूर्णत्वास आलेले असून संबंधित विभागाच्या भोंगळ कारभारामुळे उड्डाणपुलावरून वाहतूक आज पर्यंत सुरु होऊ शकलेली नाही. त्यातच शासनाने ज्या उद्दात्त हेतूने हा उड्डाणपूल निर्माण केला आहे तो सफल होतांना दिसत नाही.
त्यामुळे नाडगाव ता. बोदवड येथील बांधण्यात आलेला रेल्वे उड्डाणपूल येत्या दोन दिवसात वाहतुकीसाठी मोकळा (सुरू) करावा अन्यथा आम्हाला पुढे होऊन यावरून जनतेसाठी वाहतूक सुरु करावी लागेल असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक,भारतीय रेल्वे, भुसावळ जंक्शन, ता. भुसावळ जि.जळगाव तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम(उत्तर) विभाग, जळगाव जि.जळगाव यांना दिलेल्या लेखी पत्रात दिलेला आहे.