जळगाव, 17 मार्च (हिं.स.) जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरातील कंजरवाडा, तांबापुर आणि शिरसोली भागात अवैध दारूविक्री आणि हातभट्टी दारू निर्मिती विरोधात मोठी मोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी कारवाई करत २७ जणांना अटक केली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सण-उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन उपद्रव करणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ११ पोलीस अधिकारी , ४८ पोलीस अंमलदार, २२ होमगार्ड आणि RCP-QRT पथक यांचा ताफा होता. पोलिसांनी पहाटे छापेमारी करत २७ संशयितांना ताब्यात घेतले. १०,०१५ लीटर दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹ ७,०१,६२० इतकी आहे. जप्त दारू आणि साहित्य तत्काळ नष्ट करण्यात आले. सर्व संशयित आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.