“फक्त ५२ सेकंद… आणि थांबतो संपूर्ण शहर! मुक्ताईनगरच्या या अद्भुत परंपरेने हरखून जाल!”
लेखन: संतोष मराठे
भारत देशात दररोज राष्ट्रगीतासाठी संपूर्ण शहर थांबते, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे! महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि तेलंगणातील नलगोंडा ही दोन अशी ठिकाणं आहेत, जिथं रोज सकाळी ८ वाजता राष्ट्रगीताच्या ५२ सेकंदांसाठी सर्वकाही थांबतं!
होय, अगदी रस्त्यावरची वाहतूक, दुकानातील व्यवहार, शाळा, कार्यालयं, आणि अगदी घरांमधील कामंही! सर्वजण जिथं आहेत, तिथंच थांबतात – एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहतात आणि “जन गण मन” या आपल्या राष्ट्रगीताचे गायन करत देशभक्तीची अनोखी अनुभूती घेतात.
मुक्ताईनगर: देशभक्तीचे जिवंत उदाहरण
मुक्ताईनगर हे केवळ अध्यात्मिक , धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या नव्हे, तर आता देशभक्तीच्या परंपरेसाठीही परिचित होत आहे. दररोज सकाळी ८ वाजता, लाऊडस्पीकरवर राष्ट्रगीत वाजवले जाते आणि संपूर्ण शहर थांबते. ही परंपरा प्रथम लक्ष्मण सापधरे या युवकाने सुरू केली होती. काही काळ ही परंपरा थांबली होती, पण “मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी” आणि काही सेवाभावी देशभक्त नागरिकांनी पुढाकार घेतला. त्यांनी वर्गणी गोळा करून ४ लाऊडस्पीकर आणि अॅम्प्लिफायरची व्यवस्था केली.
ही राष्ट्रभक्तीची लाट प्रवर्तन चौकात पुन्हा दणक्यात सुरू झाली – १ मे २०२५ महाराष्ट्र दिनापासून. लक्ष्मीनारायण प्रोव्हिजन आणि डॉ. बोथरा यांच्या इमारतीवरून रोज सकाळी ८ वाजता सूचना दिली जाते आणि नंतर राष्ट्रगीत वाजते. रस्त्यावरचे वाहनचालकही आपापल्या वाहनातून उतरून उभे राहतात आणि आदराने राष्ट्रगीत गातात.
१०५ फूट उंचीचा तिरंगा – मुक्ताईनगरची ओळख
या देशभक्त परंपरेला अधिक साज चढवतो तो म्हणजे आ. चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने उभारलेला १०५ फूट उंचीचा भव्य तिरंगा. हा तिरंगा मुक्ताईनगरच्या अस्मितेचे प्रतीक बनला आहे. दररोज राष्ट्रगीताच्या वेळी तिरंग्याकडे नजर लावून उभे राहिलेलं दृश्य पाहणं ही एक अविस्मरणीय अनुभूती आहे.
संपूर्ण देशासाठी प्रेरणा
स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनापुरतेच राष्ट्रगीत मर्यादित असावं, असं मुक्ताईनगरवासीयांना मान्य नाही. इथं देशभक्ती फक्त सणापुरती नसून रोजच्या जीवनाचा भाग आहे. या उपक्रमामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये देशप्रेमाची भावना दृढ होत आहे.
मुक्ताईनगर – महाराष्ट्रातील संतधाम
- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या धाकट्या भगिनी, आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांचं अंतर्धान समाधी स्थळ हे मुक्ताईनगर येथे स्थित आहे.
- महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चार संतधामांमध्ये – आळंदी, त्र्यंबकेश्वर, सासवड आणि श्रीक्षेत्र मुक्ताईनगर यांचा समावेश होतो.
- दर एकादशीला, येथे लाखो वारकरी व भक्तगण टाळ-मृदुंगाच्या गजरात पायी दिंडी सोहळे आणि विविध वाहनांनी दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येतात.
- मुक्ताईनगर शहराला संत मुक्ताईंच्या आध्यात्मिक शक्तीमुळे एक नवीन ओळख आणि धार्मिक ऊर्जा प्राप्त झाली आहे.
- हे शहर आज संतपरंपरेचा जागृत केंद्रबिंदू ठरत असून वारसाहक्काने भक्ती आणि श्रद्धेचा संगम बनले आहे.
तुम्ही कधी मुक्ताईनगरला गेला, तर सकाळी ८ वाजता नक्की रस्त्यावर या – आणि अनुभवा ती ५२ सेकंदांची स्तब्ध शांतता, जिथं काळ थांबतो… आणि देशभक्ती झंकारते!