भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ मुक्ताईनगरात महायुतीची तिरंगा यात्रा
कर्तव्यदक्ष सैन्यदलाबद्दल देश कृतज्ञ : जयपाल बोदडे यांचा गौरवोच्चार
मुक्ताईनगर प्रतिनिधी :
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा नाश केला. या शौर्यपूर्ण कारवाईचा अभिमान व्यक्त करत व सैनिकांच्या पराक्रमास सैल्यूट देण्यासाठी मुक्ताईनगर शहरात आज महायुतीच्या वतीने भव्य “तिरंगा यात्रा” काढण्यात आली.
तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रप्रेमाचा जागर
यात्रेची सुरुवात प्रवर्तन चौकातील शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून करण्यात आली. रणरणत्या उन्हातदेखील जनतेचा उत्साह ओसंडून वाहत होता. दुपारी ठिक २ वाजता या यात्रेला शुभारंभ झाला.
घोषणांनी दुमदुमले रस्ते
पूर्ण व्हिडिओ बातमी पहा आमच्या Muktai varta युट्यूब चॅनल व फेसबुक प्लॅटफॉर्म वर
‘सैनिकों के सन्मान में हर भारतीय मैदान में‘, ‘भारत माता की जय‘, ‘ऑपरेशन सिन्दूर – घुसके मारा है‘ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तिरंगा हाती घेऊन नागरिक, युवक, महिला, शिवसेना-भाजप-युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जयपाल बोदडे : “कर्तव्यदक्ष सैन्यदलाचे आपण ऋणी”
या यात्रेच्या निमित्ताने माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती व विद्यमान भाजप तालुका अध्यक्ष जयपाल बोदडे यांनी सांगितले की, “आपल्या शूर जवानांनी दाखवलेले पराक्रम संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आपण सदैव ऋणी आहोत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही यात्रा आहे.”
राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य संदेश
या यात्रेमुळे मुक्ताईनगर शहरात राष्ट्रभक्तीचा नवा उभारी मिळाल्याचे चित्र दिसून आले. तरुणाईने घोषणांनी वातावरण भारावून टाकले. या यात्रेद्वारे जवानांचा गौरव करत त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संपादकीय टिप्पणी :
अशा उपक्रमांद्वारे समाजात एकात्मता, देशभक्ती आणि सैन्यदलाबद्दल आदराची भावना वृद्धिंगत होते. अशा तिरंगा यात्रांचा सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण संदेश जातो, हे नक्की.