मुक्ताईनगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आमदार चंद्रकांत पाटलांचे निर्देश
मुक्ताईनगर, २९ जून २०२५: रविवार, २९ जून रोजी मुक्ताईनगर मतदार संघातील मुक्ताईनगर, रावेर आणि बोदवड तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली असून, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत, आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी मुक्ताईनगर, रावेर आणि बोदवड येथील तहसीलदारांना या संदर्भात पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी, गावोगावी तात्काळ पंचनामे करून नुकसानीचा योग्य अहवाल शासनाकडे सादर करावा, जेणेकरून बाधित शेतकरी आणि नागरिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळू शकेल, असे म्हटले आहे.
आमदार पाटील यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत. या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. प्रशासनाच्या तात्काळ कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.