मुंबई, १७ मार्च (हिं.स.) – कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा करण्यासाठी आज (१७ मार्च) कोल्हापूर येथे हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या नामविस्ताराचा निर्णय शासनाने तातडीने घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत केली.
कोल्हापूरात काढण्यात येणार्या या मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’, ‘आंतरराष्ट्रीय छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे विविध वास्तूंना राष्ट्रपुरुषांच्या नावाचा आदराने उल्लेख केला जातो. यासह राज्यात राष्ट्रपुरुषांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्या असेल त्यांचा आदराने उल्लेख करण्यात यावा, असे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले.