शिवसेनेचा महासंकल्प! १ मे पासून मुक्ताईनगरात घराघरांत सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ
मुक्ताईनगर – येथील शासकीय विश्रामगृहावर २८ एप्रिल रोजी शिवसेनेच्या शहर पक्ष संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आगामी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुक्ताईनगर शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य सदस्य नोंदणी अभियान हाती घेण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सदस्य नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शहरातील सर्व १७ प्रभागांमध्ये घराघरात पोहोचून केली जाणार आहे.
ठळक मुद्दे :
- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
- १ मे पासून शहरात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार
- नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने केली जाणार
- शहरातील १७ प्रभागांमध्ये प्रभाग निहाय सदस्य नोंदणीचे नियोजन
- अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीत ठराव मंजूर
- घराघरांत जाऊन शिवसेनेचा विस्तार करण्याचा निर्धार
- लाडक्या बहिणी महिलांची देखील शिवसेना सदस्य नोंदणी केली जाणार आहे.
सविस्तर बातमी :
२८ एप्रिल २०२५ रोजी सोमवारी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहावर शिवसेना शहर पक्ष संघटनेची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडली. बैठकीत आगामी १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या दिवशीपासूनच मुक्ताईनगर शहरात शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान जोमाने राबविले जाणार आहे. सदस्य नोंदणी मोहीम ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने राबविली जाणार असून, शहरातील सर्व १७ प्रभागांमध्ये प्रभाग निहाय घराघरांत जाऊन नागरिकांना शिवसेनेत सहभागी करून घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या बैठकीला उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, शहर संघटक वसंत भलभले, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, माजी शिवसेना शहर प्रमुख ,गटनेता राजेंद्र हिवराळे, शहर समन्वयक सचिन पाटील, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नितीनकुमार जैन तसेच नगरसेवक पीयूष मोरे, निलेश शिरसाट, संतोष मराठे, दीपक नाईक, संतोष माळी, गणेश पाटील, राहुल धनगर, हरी माळी, निलेश घुले, स्वप्नील श्रीखंडे, आकाश सापधरे, सचिन पालवे, चंद्रकांत मराठे आदींसह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शिवसैनिकांनी शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा व शिवसेनेच्या विचारधारेची सखोल माहिती देत संघटना बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. घराघरांत जाऊन थेट जनतेच्या संपर्कात येण्याचा उपक्रम शिवसेनेला नवसंजीवनी देईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.