मुक्ताईनगरात सराफा दुकानात धाडसी चोरी, ३० लाखांचा ऐवज केला लंपास
मुक्ताईनगर- शहरातील भुसावळ रोड वरील अंबिका ज्वेलर्स या दुकानावर धाडसी दरोडा टाकण्यात आला असून यात चोरट्यांनी सोने आणि चांदी यांचे एकत्रीतपणे सुमारे ३० लाख लाखांचे दागिने लंपास करण्यात आल्याचे आज उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या वायरी तोडून कॅमेरा वार रूम च्या मशिनरी देखील गायब केल्याने पोलिसांसमोर चोरीचा छडा लावण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे.
शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या अंबिका ज्वेलर्स या सराफा दुकानात रात्री धाडसी दरोडा घालण्यात आला. आज सकाळी ही बाब उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्वेलर्स चे संचालक अनिल शुरपाटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दुकानात दरोडा पडल्याची माहिती मिळाली. यात सुमारे २५ लाख रूपयांची चांदी तर पाच लाख रूपयांच्या सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकाला माहिती दिली असून पंचनामा करून याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर जळगावहून तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान, भुसावळ रोडवरील रात्रभर सतत रहदारीची वर्दळ व भर बाजारपेठेत असलेल्या ज्वेलर्स दुकानातील या धाडसी दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील , शिवसेना तालुका प्रमूख छोटू भोई, गटनेते राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, माजी उपजिल्हा प्रमूख गोपाळ सोनवणे, माजी सरपंच रामभाऊ पूनासे यांनी घटनास्थळी भेट दिली व ज्वेलर्स चे संचालक चंद्रकांत शुरपाटणे, अनिल शुरपाटणे सचिन शुर पाटणे यांच्याशी चर्चा केली.