मोठी बातमी: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचे पाकिस्तानविरोधात पाच कठोर निर्णय!
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. या अमानवी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचाही समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत असून, मोदी सरकार काय पाऊल उचलेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने सीसीएस (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी) ची बैठक बोलावली आणि पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली. या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत भारत सरकारचे पाच मोठे निर्णय जाहीर केले. हे निर्णय पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईकसारखे असून, त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.
भारत सरकारचे पाच कठोर निर्णय:
- सिंधू पाणी करार स्थगित
भारताने १९६० साली लागू झालेला सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यावर थेट परिणाम होणार आहे. हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. - अटारी बॉर्डर बंद
अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना १ मेपर्यंत देशात परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. - पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद
भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ बंद केली आहे. कोणत्याही नव्या व्हिसा अर्जाला आता मंजुरी मिळणार नाही. - पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश
भारतात असलेल्या पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांना एका आठवड्यात देश सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत. यामध्ये दूतावासातील उच्च अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. - पाकिस्तानी उच्चायोग बंद
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोग तात्पुरता बंद करण्यात आला असून, सर्व पाकिस्तानी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने पाकिस्तानात माघारी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णायक पावलांमुळे भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की दहशतवाद सहन केला जाणार नाही. या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचे धोरण ठाम आणि स्पष्ट असल्याचे दिसून येते.