संत मुक्ताई पालखी सोहळा १८ जून रोजी करणार पंढरपूरकडे प्रस्थान !
७५० ऐवजी ६०० किमी अंतर चालणार, १८ जूनला मूळ मंदिर समाधी स्थळ कोथळीतून होणार प्रस्थान
मुक्ताईनगर जि. जळगाव –
हजारो व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या मार्गांत मागील वर्षी ४० वर्षांनंतर बदल करण्यात आला होता. पूर्वी ३४ दिवसांत ७५० किमी अंतर पायी चालून ही पालखी पंढरपुरात दाखल व्हायची. नवीन रचनेत आडमार्ग व फेऱ्याचा प्रवास कमी केल्याने हा सोहळा मागील वर्षी २४ दिवसात महामार्गाने ६०० किमी अंतर चालून आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी पंढरपुरात पोहोचला होता.
दरम्यान, यंदा चा पालखी सोहळा देखील त्याच धर्तीवर निघणार असून दि.१८ जून २०२४ रोजी हा पालखी सोहळा, जळगाव जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथील श्री संत आदिशक्ती मुक्ताई मूळ मंदिर समाधी स्थळ कोथळीतून प्रस्थान ठेवणार असून पंढरपूर येथे आषाढी वारी पूर्वी दि.१४ जुलै २०२४ पोहोचणार आहे.
श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून या पालखी सोहळ्याचे संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे, श्री क्षेत्र मुक्ताईनगर मुळ समाधी स्थान मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे नियोजन करीत असतात.
संत मुक्ताईच्या आषाढी वारी पालखीला ३१३ वर्षांची परंपरा आणि मानाचे स्थान आहे. कारण, मुक्ताईंची पालखी आल्याशिवाय इतर कोणत्याही संतांच्या पालखीला पंढरपुरात प्रवेश मिळत नाही. दरवर्षी हा पालखी सोहळा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथून मुळ समाधी स्थळावरून निघत असतो. पुढे ३४ दिवसांत सहा जिल्हांमधून ७५० किमी पायी प्रवास करून पंढरपुरात दाखल होतो. पण, या पारंपरिक मार्गात पालखीला अनेक वेळा मुख्य मार्ग ( महामार्ग ) सोडून आडमार्गाने, फेऱ्याने प्रवास करावा लागत होता. त्यात मुक्कामांची संख्या म्हणजेच प्रवासाचे दिवस वाढत होते. शिवाय ग्रामीण भागातील खराब रस्त्यांमुळे अनेकदा पायी दिंडी वेगळी व रथ, पालखीचा मार्ग वेगवेगळा होत होता. पालखी मुक्कामाच्या गावात गेल्यानंतर नगर प्रदक्षिणा होत असे. पण, वारकरी दिवसभर पायी चालून थकल्याने ही प्रदक्षिणा त्रासदायक व्हायची. आता पालखी तळावरच भाविकांना दर्शनासाठी यावे लागेल. जुन्या नियोजनामुळे अडचणी येत होत्या. तसेच खराब रस्त्यांमुळे रथ नेताना अडचणींचा सामना होत होता.
असा असेल पालखी मार्ग व मुक्काम
१८ जून- मूळ मंदीर प्रस्थान
१९ जून- (दुपारी मुक्काम) दसरखेड, (रात्री मुक्काम) मलकापूर
२० जून- (दुपारी मुक्काम) शेलापुर, (रा. मु.) मोताळा
२१ जून- (दु. मु.) राजुर,(रा. मु.) बुलढाणा
२२ जून- (दु. मु.) बुलढाणा, (रा. मु.) येळगाव
२३ जून- (दु. मु.)हातनी,(रा. मु.)चिखली
२४ जून- (दु. मु.) बेराळा फाटा, (रा. मु.) भरोसा फाटा
२५ जून- (दु. मु.)अंढेरा फाटा,(रा. मु.) देऊळगाव मही
२६ जून- (दु. मु.)गणपती मंदिर,आळंद,(रा. मु.) देऊळगाव राजा
२७ जून-(दु. मु.)वाघरूळ,(रा. मु.) कन्हैया नगर जालना
२८ जून-(दु. मु.)गोरक्षण,जालना,(रा. मु.) काजळा फाटा
२९ जून- (दु. मु.)शेवगाव पाटी,(रा. मु.) अंबड
३० जून- (दु. मु.)शहापूर (दाढेगाव),(रा. मु.) वडीगोद्री
१ जुलै- (दु. मु.)शहागड,(रा. मु.) गेवराई
२ जुलै- (दु. मु.)गढी (जय भवानी साखर कारखाना),(रा. मु.)पाडळसिंगी
३ जुलै- (दु. मु.)नामलगाव फाटा,(रा. मु.) बीड माळीवेस (हनुमान मंदिर)
४ जुलै- (दु. मु.)बीड माळीवेस (हनुमान मंदिर),(रा. मु.) बीड (बालाजी मंदिर)
५ जुलै- (दु. मु.)बीड अहिर वडगाव,(रा. मु.) पाली
६ जुलै-(दु. मु.)उदंड वडगाव,(रा. मु.)वानगाव फाटा
७ जुलै- (दु. मु.)चौसाळा,(रा. मु.) पारगाव
८ जुलै- (दु. मु. )येसवंडी ,(रा. मु.) वाकवड
९ जुलै- (दु. मु.)भूम, (रा. मु.) भूम
१० जुलै- (दु. मु.)आष्टा,(रा. मु.) जवळा
११ जुलै-(दु. मु.)वाकडी,(रा. मु. )शेंद्री
१२ जुलै- (दु. मु.) वडशिंगे,(रा. मु.) माढा
१३ जुलै- (दु. मु.)वडाची वाडी,(रा. मु.)आष्टी
१४ जुलै-(दु. मु.) रोपळे,(रा. मु.) पंढरपूर