आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने संत मुक्ताईनगर येथे मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय !
संत मुक्ताईनगर : उदया बुधवारी आषाढी एकादशी असल्याने प्रत्येकाला विठ्ठलाची आणि आषाढीची आतुरता लागून आहे. मात्र यंदाची आषाढी एकादशी वेगळी ठरणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद आल्याने हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरी होणार आहेत. मात्र, या सणाच्या निमित्ताने संत भूमी तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर शहर व तालुक्यामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन बघायला मिळत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मुस्लिम समाज बांधवांच्या शिष्ट मंडळाने पोलिस निरीक्षकांना निवेदन देवून निर्णय जाहीर केला असून आदिशक्ती संत मुक्ताई च्या भूमीत आम्ही सर्व मुस्लिम बांधव वारकरी संप्रदायाच्या भावनांना अपेक्षित राहून स्वमर्जिने हा निर्णय घेत असल्याचे निवेदनात म्हटलेले आहे. दरम्यान या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कौतुक होत आहे.
आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यामुळे त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय पंढरपूरसह छत्रपती संभाजीनगर जिल्हा व यानंतर संत भूमी तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथेही मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. यामुळे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुन्हा हिंदू मुस्लिम एकता बघायला मिळाली आहे.
निवेदन देतेवेळी आरिफ आझाद, आसिफ बागवान, अफसर खान,हकीम चौधरी, शे.शकील शे. गफुर, मस्तान कुरेशी, नुरमोहम्मद खान, सलीम खान , युनूस खान , जाफर अली, शकुर जमदार, कलीम मणियार आदींसह असंख्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.