लखनऊ, 25 मार्च (हिं.स.) : विरोधकांच्या इंडि आघाडीने लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी जॉर्ज सोरोसचा परदेशी पैसा वापरला. त्या पैशातून भाजपच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा घणाघाती आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज, मंगळवारी एका मुलाखतीत केला.
यावेळी योग आदित्यनाथ म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस सरकारने धर्माच्या आधारावर मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण दिले आहे. अशाप्रकारे नियमबाह्य धर्माच्या आधारे आरक्षण देणे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा अपमान आहे, पण आज कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार जे बोलत आहेत, ते काँग्रेसकडून त्यांना मिळालेल्या राजकीय वारशातूनच बोलत असल्याचा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. कारण भाजप विरुद्ध विरोधकांनी अपप्रचार केला होता. खोटा नॅरेटिव्ह चालवला होती.
इंडि आघाडीने जॉर्ज सोरोसचा पैसा लोकसभा निवडणुकीत वापरला. त्यातून भाजप सरकार विरुद्ध अपप्रचार केला. विदेशी शक्तींना भारतामध्ये भाजपचे सरकार नको होते. जॉर्ज सोरोस यांनी तसे पूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे त्यांनी इंडि आघाडीला भरपूर पैसा पुरवून लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप केला होता. इंडि आघाडीने त्यांचा पैसा वापरून देशद्रोह केला, असा घणाघाती आरोपही योगींनी केला. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यानंतर योगी आदित्यनाथ प्रथमच जाहीरपणे विदेशी हस्तक्षेपाबद्दल बोलले, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
दरम्यान काही लोक देशात दुफळी माजवायला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करतात. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याला फक्त स्वतःचा जन्मसिद्ध अधिकार मानून इतरांचा अपमान करतात. पण आता देशातील जनता असले खोटे बोलणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानायला तयार नाही, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी कुणाचे नाव न घेता लगावला.