नवी दिल्ली , 5 मार्च (हिं.स.)।दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने अखेर चार वर्षांनंतर जामीन मंजूर केला. सुशील कुमार ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी मे 2021 पासून तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे.
सागर धनखडच्या हत्येप्रकरणी मे 2021 मध्ये कुस्तीपटू सुशील कुमारला अटक करण्यात आली होती. ऑक्टोबर 2022 मध्ये या प्रकरणात सुशील कुमार आणि इतर 17 जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते.यानंतर अखेर चार वर्षानंतर दिल्ली उच्च न्यायालयाकडून कुस्तीपटू सुशील कुमारला मंगळवारी (दि. 4) जामीन मंजूर करण्यात आला.न्यायाधीश संजीव नरुला यांनी सुशील कुमारला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यापूर्वीही गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला एका आठवडय़ासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.
सागर धनखड हत्याकांड प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याच्या मित्रांना छत्रसाल स्टेडियमचा दरवाजा आतून बंद करून काठय़ा, हॉकी आणि बेसबॉल स्टिकने 30 ते 40 मिनिटे मारहाण केली. 2021 मध्ये 4 आणि 5 मे च्या मध्यरात्री जमिनीच्या वादातून सुशील कुमार आणि इतरांनी धनखड आणि त्यांच्या चार मित्रांना स्टेडियममध्ये मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीतील गंभीर दुखापतींमुळे पुढे सागरचा मृत्यू झाला होता.