नाशिक, 5 एप्रिल (हिं.स.) उबठा गटाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व विकले. मराठी मातीशी गद्दारी केली. एवढे कमी की काय म्हणून औरंग्याच्या कबरीजवळ नमाज पठणही केले. अशा हिंदूत्व विरोधी लोकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांकडून आणखी वेगळी काय अपेक्षा ठेवणार? अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणिस विजय चौधरी यांनी केली. एनडी पटेल मार्गावरील वसंतस्मृती या भाजपच्या कार्यालयात शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना चौधरी म्हणाले की, सहा वर्षांनी सभासद नोंदणीची व्यापक मोहीम सुरू केली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक महसूल विभागात १ लाख २५ हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार आगामी तीन दिवसात महाराष्ट्रातून १ कोटी ५१ लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण होईल. भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाला उत्तर महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणी अभियान जोरात सुरु असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी पुढील तीन दिवस जास्तीत जास्त सदस्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही विजय चौधरी यांनी सांगितले.
दिलेले उद्दिष्ट पुर्ण होणार
राज्यासाठी देण्यात आलेले १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट नक्की पुर्ण होईल. तसेच आगामी तीन दिवसात तर उत्तर महाराष्ट्रात तीस लाख नवीन सदस्य़ जोडले जाणार आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक नोंदणी झालेला पक्ष भाजप ठरला असल्याचा दावा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केला.
विधावसभानिहाय १० हजार सदस्य नोंदणी
नाशिक जिल्ह्यात ६ लाख तर शहरात २ सभासद नव्याने पक्षासोबत जोडण्यात आले आहे. तर दिलेले उद्दिष्ट पुर्ण करण्य़ासाठी उत्तर महाराष्ट्रात १५ हजार बूथद्वारे सभासद नोंदणी मोहीम सुरु आहे. या प्रत्येक बुथवर १२ कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघाला पुढील तीन दिवसांसाठी १० हजार सदस्य नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यादष्टीने ३ दिवस, ३ तास आणि ३० घरे एका कार्यकर्त्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार हे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास विजय चौधरी यांनी व्यक्त केला.