अमरावती, 25 मार्च (हिं.स.)।
उन्हाळा नुकताच सुरू झाला असून सर्वत्र थंडपेय आणि रसाळ फळांची मागणी वाढत आहे. यात लाल रंगाचे रसरशीत लालेलाल कलिंगडाचाही आस्वाद घेतला जातोय. परंतु, यंदा कलिंगडाचे उत्पादन व आवक वाढल्याने बाजारात दर घसरले असून यापुढेही यात फारशी वाढ होणार नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे बाजारपेठेत आवक वाढलेल्या कलिंगडाची २० रुपये प्रतिकिलो दराने विक्री करावी लागत असल्याने उत्पादक बळीराजा मात्र चिंताग्रस्त झाला आहे.
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु असून दिवसा उन्हाचा तडाखा वाढला आहे. दुपारच्या वेळी घशाला कोरड पडते. अशात रसदार फळांचा आस्वाद घेण्याकडे नागरिकांचा कल असतो. दरम्यान ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात कलिंगड, खरबूज, द्राक्ष आदी फळे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. सध्या फळांचे दरही सामान्यांच्या आवाक्यात आहेत. जानेवारीपासून टरबूज बजारात दाखल झाल्याने ग्राहकांकडून सातत्याने खरेदी सुरू आहे. दर्जा, चव उत्तम असल्याने ही फळे दर्यापूरकरांच्या पसंतीस उतरली आहेत. सध्या फळांचा राजा आंबा येण्याची प्रतीक्षा संपली आहे. काही दुकानांवर आंबा विक्रीस दिसून येत आहे. मात्र, कलिंगड मोठ्या प्रमाणात आठवड्यात दाखल झाले आहे.
मागील वर्षी कलिंगडाचे भाव सुरुवातीला ८० रुपये होते. यंदा मात्र, हंगामाच्या सुरुवातीपासूनच दर १५ ते २० रुपये किलो आहे. यामुळे येत्या काळात अजून दर कमी होतील की वाढतील ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुरुवारच्या आठवडी बाजारासह दर्यापूरातील बसस्थानक चौक, रेल्वेगेट चौक, बुटी चौक, पेट्रोल पंप चौक, जयस्तंभ चौक, अकोट रोड बनोसा, बाभळी टी.पाईंट, अंजनगाव सुर्जी-अकोला टी.पाईंटसह इतरत्र कलिंगड विक्रीस उपलब्ध आहेत. ग्राहकांकडूनही खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.