पुणे, 5 मार्च (हिं.स.) कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहरासाठी पाणी कमी पडू दिले जाणार नाही, पाणी कपात लागू होणार नाही अशी घोषणा केली जात आहे. पण प्रत्यक्षात शहराच्या विविध भागात पाणी पुरवठ्याची वेळ एका ते दीड तासाने कमी करण्यात आली आहे.अनेक भागात पूर्णवेळ पाणी असले तरी त्याला पुरेसा दाब नसल्याने टाक्या भरत नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे कडक उन्हाळा सुरु होण्याच्या पूर्वीच महापालिकेने अघोषित पाणी कपात सुरु केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.यासंदर्भात भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली असून, त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
कोथरूड परिसरात विशेषतः एरंडवणे भागात अपुऱ्या व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. रोज सकाळी ९ वाजता पाणी जाते, पण गेल्या काही दिवसांपासून आठ वाजताच पाणी जात आहे.महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर त्यांनी पर्वती जलकेंद्रातूनच कमी पाणी येत असल्याचे सांगितले आहे. पर्वती जलकेंद्रातून प्रति तास ४१०० क्यूबिक मीटर पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे, पण सध्या तो ३८०० क्यूबिक मीटर प्रतितास पाणी मिळत आहे. त्यामुळे पाणी लवकर जात आहे, तर काही भागात कमी दाबाने पाणी येत असल्याचे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी सांगत आहेत.