– पंतप्रधानांकडून मदत जाहीर
विशाखापट्टणम, 30 एप्रिल (हिं.स.)। आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर सिंहाचलम येथे मंगळवारी (दि.२९)रात्री भीषण अपघात झाला आहे.श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिराच्या भिंतीचा २० फूट लांबीचा भाग कोसळल्याने हा अपघात घडला.या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सव चालू होता.यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी जमा झाली होती, त्यावेळी अचानक 20 फूट उंचीची एक भिंत कोसळली. यानंतर मंदिरात गोंधळ उडाला.सिंहगिरी बसस्थानकापासून वर जाताना मंदिराला लागून असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळील ही भिंत होती.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा २:३० ते ३ वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसामुळे हा अपघात झाला. जिल्हाधिकारी हरेंद्र प्रसाद म्हणाले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य पूर्ण केले आहे.
राज्याच्या गृह आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री वंगालपुडी अनिता यांनीही तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे माती ओली झाली, त्यामुळे भिंत कोसळल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि पीडितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. ‘पीएमओ इंडिया’ने एक्स या सोशल मीडिया साईटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याविषयी माझ्या संवेदना व्यक्त करतो. तसेच या घटनेत जखमी झालेले नागरिक लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना. प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.”