कोलकाता , 23 मार्च (हिं.स.)।आयपीएल २०२५चा शनिवारी(दि. २२) झालेल्या सलामीच्या सामन्यात आरसीबी वि. केकेआर या दोन्ही संघांमध्ये एक अटीतटीची लढत पाहायला मिळाली. यावेळी आरसीबीने केकेआरवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने १६.२ षटकांत ३ विकेट्स गमावत महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. यादरम्यान विराट कोहलीने आयपीएल इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो आजवर कोणत्याच खेळाडूला जमलेला नाही.
आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावत १७५ धावा केल्या. या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी धुव्वादार सुरूवात करून दिली. यादरम्यान विराट कोहलीने मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.विराट कोहलीने ३१ चेंडूंत ४ षटकार आणि ३ चौकारांसह अर्धशतकी खेळी पूर्ण केली. विराट कोहलीने केकेआरविरूद्ध सामन्यात ३८ धावा करत आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध १००० धावा पूर्ण केल्या. यासह विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात चौथ्या संघाविरूद्ध १००० धावांचा टप्पा गाठला आहे. त्याच्याशिवाय कोणत्याच फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.
विराट कोहलीने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांविरूद्ध ही कामगिरी केली आहे. विराटशिवाय वॉर्नर आणि रोहित शर्मा यांनी २-२ संघांविरूद्ध १००० धावांचा टप्पा गाठला आहे. विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १०५७ धावा केल्या आहेत, तर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १०५३ धावा आणि पंजाब किंग्जविरुद्ध १०३० धावा केल्या आहेत. आता विराटच्या या यादीत केकेआरचा संघही सामील झाला आहे. चेस मास्टर विराट कोहलीने या विक्रमासह संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.