मुंबई, 1 एप्रिल (हिं.स.)।राज्यातील काही भागांत दोन दिवसांपासून मध्यम ते हलक्या स्वरूपातील अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.पुढील पाच दिवस असेच हवामान राहणार आहे. याशिवाय हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी आज(दि. १) आणि उद्या(दि. २)पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1 ते 3 तारखेपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत बुधवार(दि. २)पाऊस होईल असा अंदाज आहे. या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट मिळाला आहे.जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, पुण्यातील घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट तर सातारा जिल्ह्यात उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यासाठी 3 आणि 4 एप्रिल, नांदेडसाठी 4 एप्रिल, लातूर, धाराशिव जिल्ह्यांसाठी 3 व 4 एप्रिल, अकोला आणि अमरावतीत पुढील दोन दिवस, भंडारा जिल्ह्यात 2 ते 4 एप्रिलपर्यंत, बुलढाणा आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्वच ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामान अस्थिर राहणार आहे. हवामान विभागाच्या सततच्या निरीक्षणानुसार परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी.