जळगाव,3 मे (हिं.स.) बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा धरणात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोयगाव तालुक्यातील नांदगाव येथे ३ मे रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. तरुणांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी दोन्ही तरुणांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रमांकाने सोयगाव पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे.
अकील खान शकील खान पठाण (वय १८, रा. नांदगाव तांडा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजी नगर), रेहान भिकन पठाण (वय १७, रा. सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा जि. जळगाव) व शाकीब कलंदर पठाण (वय १३, रा. घाटनांद्रा ता. कन्नड) हे तिघे तरुण ३ मे रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास नांदगाव येथील धरणात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता यातील अकिल खान शकिल खान पठाण व रेहान भिकन पठाण या तरुणांचा अचानक धरणात तोल गेला.
घटनास्थळी असलेला तिसरा तरुण शाकीब पठाण याने हा प्रकार पाहताच गावाकडे धाव घेवुन सदरचा प्रकार ग्रामस्थांना कळविला असता ग्रामस्थांनी धरणाकडे धाव घेत दोघं तरुणांना पाण्यातुन बाहेर काढले व तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तो पर्यंत खुप उशिर झाला होता. दोघं तरुणांना वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. अकिल पठाण हा नांदगाव तांडा येथील रहिवासी असुन त्याचे पश्चात्य आई, वडिल, एक भाऊ असा परिवार आहे.
तर रेहान पठाण हा मुळचा सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील रहिवासी असुन त्याचे पश्चात्य आई व एक भाऊ असा परिवार आहे. रेहान पठाण याची आई सुरत येथे धुणी भांडी करण्याचे काम करते. रेहान पठाण हा नांदगाव तांडा येथे मामांकडे राहण्यासाठी आला होता. दोन तरुणांचा धरणात बुडुन मृत्यू झाल्याने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद सोयगाव पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे.