मुंबई , 9 एप्रिल (हिं.स.)। जून ते सप्टेंबर या महिन्यांच्या कालावधीत देशात सरासरीच्या सुमारे 103 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विषयक खासगी संस्था ‘स्कायमेट’ने जाहीर केला आहे.प्राथमिक अंदाजानुसार, यंदाचा पावसाळा देशासाठी सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे
स्कायमेटच्या या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पावसाची शक्यता आहे. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये सरासरीच्या 96% म्हणजे सुमारे 165.3 मि.मी पाऊस होण्याची शक्यता आहे तर जुलैमध्ये सरासरीच्या १०२% म्हणजे २८०.५ मि. मी, ऑगस्टमध्ये सरासरीच्या 108% म्हणजे 254.9 मि.मी, सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 104% म्हणजे 167.9 मि.मी पाऊस होण्याची शक्यता आहे.यंदाच्या मान्सून हंगामात ‘ला निना’ स्थिती कमकुवत राहण्याची शक्यता असून, ‘अल निनो’चा फारसा प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळे देशात एकंदर मान्सूनची स्थिती अनुकूल राहण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच पश्चिम व दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पावसाची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम घाटातील केरळ, कर्नाटक किनारपट्टी व गोवा या भागांत जोरदार, धुवांधार पाऊस होऊ शकतो. मात्र, उत्तर भारतातील काही राज्ये आणि पर्वतीय भागांमध्ये सरासरीच्या तुलनेत थोडासा कमी पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजामुळे खरीप हंगामाची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच जलसंधारण, पाणीसाठा व्यवस्थापन आणि शेती योजना आखण्यासाठी राज्य प्रशासनासाठीही हा अंदाज उपयुक्त ठरणार आहे.