मुंबई, 16 एप्रिल (हिं.स.)।मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्यासह माजी महान भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर स्टँड आहेत. आता या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्माचे नावही जोडले जाणार आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आता रोहित शर्माच्या नावावर एक स्टँड असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएने रोहित शर्माच्या स्टँडला नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मंगळवारी १५ एप्रिल रोजी झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, आणखी दोन स्टँडला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि दिग्गज माजी कर्णधार अजित वाडेकर यांचेही नाव देण्यात येणार आहे. ‘बैठकीत स्टँडच्या नावाला एकमताने मान्यता मिळाली असल्याचे क्रिकेट संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे.
,मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या ग्रँड स्टँड लेव्हल ३ ला शरद पवार स्टँड नाव दिले जाईल. तर ग्रँड स्टँड लेव्हल ४ ला अजित वाडेकर स्टँड असे नाव दिले जाईल. दिवेचा पॅव्हेलियन लेव्हल ३ ला रोहित शर्मा स्टँडचे नाव दिले जाणार आहे. २०११ च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करणाऱ्या वानखेडेवर आधीपासूनच सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विजय मर्चंट आणि दिलीप वेंगसरकर या दिग्गजांच्या नावाचे स्टँड आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन रोहित शर्मा स्टँड आणि इतर दोन स्टँडचे अनावरण करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करू शकते.