सोन्याचे भाव 95 हजार 97 हजारांवर पोहचू शकतात
जळगाव, 4 एप्रिल (हिं.स.) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाच्या निर्णयाची झळ आता भारताच्या सोन्याच्या दरावरही बसली आहे. आधीच 93 हजारांच्या घरात गेलेल्या सोन्याचे दर मध्यरात्रीतून 700 रुपयांनी वाढून थेट 94 हजार 700 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धारेणाच्या निर्णयामुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काही तासात किंवा काही दिवसात सोन्याचे भाव 95 हजार 97 हजारांवर पोहचू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सोन्याच्या वाढत्या दरात ग्राहक वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. सोन्याचे दर आवाक्याबाहेर जात असल्याने ग्राहकही सध्या सोने खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लग्नसरार्इला सुरुवात होत असतांनाही सराफा बाजारात मात्र शुकशुकाट दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या वाढत्या दराने चिंता व्यक्त केली जात आहे.
एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा दर 93 हजार 500 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 1 लाख 2 हजारांवर गेली आहे. जागतिक स्तरावर झालेली अनिश्चितता तसेच मुख्यत्वे अमेरिकेचे टॅरिफ धोरण वाढत्या सोन्याच्या किमतींना कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. दर आवाक्याबाहेर जात असल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या काही धोरणांचा थेट सोन्याच्या दरावर परिणाम पडत आहे. सोन्याचे दर वाढत असले तरी देखील सोन्याकडे एक शाश्वत गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघितले जाते. परिणामी ग्राहकांकडून सोन्याची विक्री कुठेही कमी झालेली नाही. मात्र, सर्वसामान्यांकडून वाढत्या सोन्याच्या दरवाढीवर चिंताजनक प्रतिक्रिया येत आहेत.