ठाणे, 5 एप्रिल (हिं.स.)। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील 30 भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन आज संपन्न झाले. यामध्ये उप अधीक्षक भूमी अभिलेख, ठाणे आणि उप अधीक्षक भूमी अभिलेख, शहापूर या कार्यालयातील भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटनही संपन्न झाले.
यावेळी ठाणे कार्यालयात आमदार नरेंद्र मेहता, उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश महेश इंगळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख सिद्धेश्वर घुले, महेश भापकर, कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरीक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपसंचालक, कोकण प्रदेश मुंबई भूमी अभिलेख महेश इंगळे म्हणाले की, ठाणे येथील उप प्रादेशिक कार्यालयातर्फे भू-प्रणाम केंद्र म्हणजे जसे जिल्हाधिकारी कार्यालयात सेतूच्या धर्तीवर भूमी अभिलेख कार्यालयातील जे अभिलेख सुरु केले आहेत. टप्प्याटप्प्याने इतर तालुक्यातही ही केंद्रे सुरु करण्यात येईल. भू-प्रणाम केंद्रामध्ये जे ऑनलाईन सुविधा आहेत. मूळात हा विभाग अभिलेख जतन करतो, संधारण करतो आणि तयार करतो. ते जनतेला सुलभपणे तात्काळ उपलब्ध होण्याकरिता मुळात आमचे संकेतस्थळ आहे ती अपडेट असून त्यावर रेकॉर्ड आहे. पूर्वी जी मागणी असायची जुन्या रेकॉर्डची असायची. परंतू या कामासाठी बराच वेळ लागायचा. परंतू आता भू-प्रणाम या सुविधामुळे तत्काळ मोजणी सुरु झाली आहे.
नागरिकांना जर रेकॉर्डविषयक माहिती घ्यावयाची असेल तर शासनाने ठरविलेल्या माफक दरात ही सेवा भू-प्रणाम केंद्रात उपलब्ध होणार आहे. यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. मोजणीचे अर्ज करणे, वारस नोंदणीचे अर्ज करणे, खरेदीचे मोजणीचे अर्ज करणे, अशा वेळी येथे येवून माफक दरात अर्ज करु शकतात आणि त्यानंतर ही प्रक्रिया सुरु होईल. या भू-प्रणाम केंद्रामध्ये येथील कर्मचारी मदत करतील व काही अडचण असेल तर मुख्य लिपिक मदत करतील. जनतेला सोयीसुविधा कमी वेळेत दररोज नकला उपलब्ध होऊन तात्काळ मिळेल. या नकला डिजिटाईज्ड असणार आहेत. त्या घरबसल्या मिळू शकतात.
ज्या लोकांकडे संगणक नाही त्यांना या सुविधा पाहिजे असेल तर यासाठी त्यांनी या ठिकाणी आल्यास त्यांना मार्गदर्शन करुन तात्काळ सेवा देण्याचे काम केले जाईल. व्हर्जन 2 आणि व्हर्जन 2.0 व व्हर्जन 1 यामध्ये काय फरक आहे तर व्हर्जन 1 मध्ये अर्ज करावा लागत होता. परंतू व्हर्जन 2.0 मध्ये घरबसल्या अर्ज करु शकतात. अर्जदारास किंवा खातेदारास कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. सर्व सेवा माहिती सर्व्हेमार्फत ऑनलाईन मिळते. याचा लाभ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी खातेदारास होईल. तसेच हा उपक्रम सुरु असताना आलेल्या लाभार्थीनी या भू-प्रणाम योजनेच्या ऑनलाईन पत्रव्यवहाराची सुविधाही देण्यात आली आहे.
यावेळी आमदार नरेंद्र मेहता म्हणाले की, सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त करतो. आज हा भू-प्रणाम प्रकल्प हाती घेवून त्यांनी चांगले काम केले आहे. महसूल मंत्री यांच्या हस्ते भू-प्रणाम केंद्राचे ऑनलाईन राज्यात विविध 30 ठिकाणी भूप्रमाण केंद्राचे उद्घाटन झाले आहे. बऱ्याच प्रमाणात जमिनीचा वाद मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याचप्रमाणे हद्दीबाबत वाद निर्माण होत असतात. आपल्या जमिनीच्या कागदपत्रांसाठी आपणास विविध कार्यालयात जावे लागते. या ऑनलाईन पद्धतीने शेतकरी, गावकरी किंवा विकासकांना सोईचे होणार आहे. आज सेतू केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा देण्यात येत आहेत. ज्यांना ऑनलाईन अर्ज, फी तसेच जमिनविषयक कामे जमत नाही त्यांना येथे येवून सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तरी मला विश्वास आहे की, ही योजना केंद्रीय पध्दतीने हळूहळू वाढत जाईल. लोकांना घरी बसून सुविधा मिळत जाईल. लोकांसाठी चांगली योजना आणल्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करतो.