अमरावती , 31 मार्च (हिं.स.)। मराठी नवीन वर्षानिमित्त बेलोरा विमानतळावरून बहुप्रतीक्षित विमानाचे केलेले उड्डाण चाचणी यशस्वी झाली असून येत्या काही दिवसांत या विमानतळावरून ७२ आसनी विमानाची वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इंदूरवरून आलेल्या एटीआर ७२ या विमानाने काल दुपारी ३.४५ वाजता बेलोरा विमानतळावर यशस्वी लॅंडिंग केले व ४.१५ वाजता नागपूरच्या दिशेने टेकऑफ करून बेलोरा विमानतळावरून उड्डयणाचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे बेलोरा एअरपोर्टवरून आता लवकरच विमानसेवा सुरू होण्याचे संकेत आहेत. विमानांची टेस्ट फ्लाइट यशस्वी ठरली असली तरी अद्यापही दोन तांत्रिक चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती आहे. ३० मार्चला टेस्टराइडनंतर लगेचच एक एप्रिलपासून बेलोरा विमानतळावरून विमान वाहतूक सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, संबंधित एअरलाइन्सकडून अद्यापही शेड्यूलिंग न झाल्याने आता विमानाचे टेकऑफ आणखी १५ दिवस लांबले आहे. अमरावतीवरून आठवड्यातून तीन दिवस मुंबईकरिता विमानाच्या फेऱ्या सुरू होणार असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप संबंधित एअरलाइन्सकडून कुठल्याही प्रकारचे शेड्यूलिंग करण्यात आलेले नाही.
मागील अनेक काळापासून बेलोरा विमानतळ वाहतुकीसाठी खुले करण्याची मागणी केली जात होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विमानतळावर तातडीने आवश्यक त्या सुविधा पूर्ण करण्यात आल्या. अलायन्स एअरलाइन्सकडे उड्डाणाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून बेलोरा विमानतळावर ४ मार्च रोजी हवाई कॅलिब्रेशन चाचणी आटोपली असून लवकरच येथून विमान वाहतूक सुरू होणार आहे. अमरावती ते मुंबई ७२ आसनी विमानसेवेचा लाभ अमरावतीकरांना मिळणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून उड्डाणाची संपूर्ण तयारी झाली असली तरी एअरलाइन्सने अद्याप विमान सुरू होण्याची तारीख जाहीर केलेली नाही. तसेच तिकिटांचे बुकिंगसुद्धा सुरू झालेले नाही. एक एप्रिलपासून विमान सुरू होणार, असा प्रशासनाचा दावा असला तरी तूर्तास तो फोल ठरला आहे.