पुणे , 19 मार्च (हिं.स.)।पुण्यातील हिंजवडी भागात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १२ कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागल्याने ट्रॅव्हरलमधील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच 6 जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (19 मार्च ) सकाळी ८ च्या सुमारास घडली. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज वनमध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ट्रव्हलर गाडी दाखल झाली. या ट्रॅव्हरलमध्ये १२ कर्मचारी होते. अचानक चालकाच्या पायाखाली आग लागली. ही बाब त्याच्या लक्षात येताच चालक आणि पुढे बसलेल्या काही कर्मचाऱ्यांनी ताबडतोब बाहेर उड्या मारल्या. पण नंतर दरवाजा लॉक झाल्याने दहा जण बस मध्येच अडकले. यात चार जणांचा जागेवर आगीत होरपळून मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हिंजवडीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती देताना हिंजवडीचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले की, ‘कर्मचाऱ्यांना कार्यालयात घेऊन जाणारे वाहन डसॉल्ट सिस्टीम्सजवळ असताना अचानक आग लागली. यामुळे चालकाला वेग कमी करावा लागला. मात्र तो इतरांचे प्राण वाचवू शकला नाही. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.’
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या घटनेचा पंचनामा केला आला असून चारही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या ट्रॅव्हरलच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याने ही आग लागल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्देवी घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आता ही आग कशामुळे लागली याचे कारण पोलिसांकडून शोधले जात आहे.