सिंधुदुर्ग, 22 मार्च (हिं.स.)। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळांमधील भारतरत्न डाॅ ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परिक्षा २०२४ मधील गुणवंत ४७ विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर अविस्मरणीय ठरली. हि सफर आटोपून हे विद्यार्थी आज सकाळी नेत्रावती एक्स्प्रेसने कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरताच कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या शाळेत आमची मुले शिकत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दात पालक डॉ. पुरळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर, आमचे स्वप्न साकार करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे विद्यार्थिनी यशश्री ताम्हणकर हिने ऋण व्यक्त केले.
‘इस्रो’ सफरवर गेलेल्या ४७ विद्यार्थी, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुधीर धनगे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांचे जंगी स्वागत आज सकाळी कुडाळ रेल्वे स्थानकावर कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षकांनी केले.
‘इस्रो’ सफरवरून नेत्रावती रेल्वेने कुडाळ रेल्वे स्थानकावर दाखल झालेल्या 47 विद्यार्थी, शिक्षक ,अधिकारी यांचे जंगी स्वागत नेरूर माड्याचीवाडी हायस्कूलच्या विदयार्थ्यांचे ढोलपथक लक्षवेधी ठरले. या विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, पालकांचे कुडाळ रेल्वेस्थानकावर प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडीने औक्षण केले. यामध्ये रश्मी कोरगावकर, सानिका मदने, प्रियंका बालम, प्राजक्ता वालावलकर, पूर्वा गावडे आदींनी सहभाग घेतला.
‘इस्रो’ सफरीमधील सहभागी ४७ विद्यार्थी ,शिक्षक ,वैद्यकीय अधिकारी आदींची पूर्णपणे काळजी व उत्तम व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्हा परिषदकडून करण्यात आली. या टीमचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी जि.प.चे आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी गोवा ते हैदराबाद आणि हैदराबाद ते तिरूअनंतपुरम असा दोनवेळा विमान प्रवास अनुभवला. विमानातील हवाईसुंदरी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पायलट विद्यार्थ्यांना भेटले. विद्यार्थ्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर पाहिले. रोहिणी २०० या भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी अनुभवले. भारतकन्या सुनिता विलीयम्स पृथ्वीवर परतली त्यावेळी तो क्षण या विद्यार्थ्यांनी ‘इस्रो’ अवकाश संशाधन केंद्रात उपस्थित राहून अनुभवला. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक विद्यार्थ्यांनी पाहिले.
‘इस्रो’ सफर ही आमच्या आयुष्यातील सुवर्णक्षण असून आयुष्यात ध्येय प्राप्तीची नवी प्रेरणा मिळाल्याचे भावोद्गार उभादांडा वेंगुर्लाची विद्यार्थीनी कु प्राजक्ता भोकरे हीने व्यक्त केले. स्वामी विवेकानंदांनी उल्लेखलेल्या पादुका व भारताचे शेवटचे टोक पाहण्याचा क्षण विलोभणीय असल्याचे वजराटची विद्यार्थीनी कु.साक्षी दळवी हिने सांगितले.
‘इस्रो’ सफरीसारखा उपक्रम यशस्वी आयोजन करून सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वप्नवत अनुभव देणे हे कौतुकास्पद असल्याचे शिक्षक समितीचे राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर यांनी व्यक्त केले. तसेच १५ मार्च २०२४ चा शासनाचा जाचक संचमान्यता आदेशामुळे जि.प.शाळा बंद पडण्याचा धोका पालकांनी ओळखून जि.प.शाळा वाचविण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे आवाहन कोरगावकर यांनी केले.
हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी