मुंबई , 31 मार्च (हिं.स.)।फेब्रुवारीमध्ये अहिल्यानगरमध्ये झालेल्या ६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत पंचाच्या निकालावर आक्षेप घेत, शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली होती. या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती.त्यानंतर आता रविवारी(दि. ३०) कर्जत येथे झालेल्या उपांत्य फेरीतही राक्षेने निकालावर आक्षेप घेतला होता. परंतू, मॅटवरील पंचाचा निकाल कायम ठेवण्यात आला.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळ कर्जत-जामखेडच्या वतीने रविवारी कर्जत येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत शिवराज सहभागी झाला होता. त्यामुळे त्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. दरम्यान, अंतिम लढतीच्या आधी उपांत्य फेरीत गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईच्या पृथ्वीराज पाटील यांच्यात कुस्ती रंगली. या कुस्तीत पृथ्वीराज याने शिवराजवर मात केली.
यावेळी शिवराज याने तांत्रिक बाबी तपासण्याची मागणी केली होती. मात्र, मॅटवरील पंचाचा निकाल कायम ठेवण्यात आला. गादी विभागात नांदेडच्या शिवराज राक्षे आणि कोल्हापूरचा संग्राम पाटील यांच्यात सेमी फायनलची कुस्ती रंगली. यात शिवराज राक्षेने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत ११ गुण मिळवत बाजी मारली. संग्राम पाटीललाही उपांत्य कुस्तीत एकही गुण मिळविता आला नाही. तर दुसऱ्या कुस्तीमध्ये मुंबईच्या पृथ्वीराज पाटील विरुद्ध सोलापूरच्या शुभम माने यांच्यात झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने बाजी मारली. पाटील याने सुरुवातीपासूनच माने याच्यावर पकड घेत ११ गुण प्राप्त करीत विजय मिळविला. शुभम मानेलाही एकही गुण मिळविता आला नाही