अमरावती, 3 एप्रिल (हिं.स.)।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरु आनंद दिघे म्हणून शिवसेनेच्या अमरावतीच्या जिल्हाप्रमुखाने बॅनरवर धर्मवीर चित्रपटातील अभिनेते प्रसाद ओक यांचा फोटो वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने नुकतीच अमरावती जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. त्यात जिल्हाप्रमुखपदी ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनवर आनंद दिघे यांच्या जागी अभिनेता प्रसाद ओक यांचा फोटो लावण्यात आला. विशेष म्हणजे स्वतः ठाकूर प्रमोद सिंह यांनी गुढीपाडवा व स्वामी प्रकट दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेल्या बॅनरवरही आनंद दिघे म्हणून प्रसाद ओकचा फोटो छापण्यात आला आहे.