मुंबई, 4 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात शिवसेनेकडून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. औरंगजेबाची भलामण करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अबू असीम आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन विधानसभेतून निलंबित करावे, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. तत्पूर्वी शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात आझमींविरोधात आक्रमक आंदोलन केले.
अबू असीम आझमी यांनी सोमवारी औरंगजेबची स्तुती करणारी विधाने केली होती. त्याचा शिवसेनेकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. विधानसभेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांचा धिक्कार केला. ते म्हणाले की, अबू आझमी यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविरोधात अबू आझमी वारंवार जाणीवपूर्वक अपमान करतो. अबू आझमी हा देशद्रोही असून त्याला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांचे ४० दिवस हाल केले. त्यांचे डोळे काढले, नखे काढली. त्यांच्या अंगावरची सालटी काढली, त्यावर मीठ टाकले. त्यांना धर्म परिवर्तनासाठी जबरदस्ती केली. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्रपुरुषाचा, देशभक्तीचा अपमान आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी राष्ट्रासाठी बलिदान दिले. शंभू राजांनी ९ वर्षांत ६९ लढाया जिंकल्या. औरंग्या हिंदूंची मंदिरे तोडली, महिलांवर अत्याचार केले. औरंग्याने स्वत:च्या बापाला कैद केले आणि २७ लोकांना मारले. या अशा क्रूरकर्म्या औरंगजेबची स्तुती करणाऱ्या अबू आझमीला सभागृहातून निलंबित करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. यावेळी शिवसेना आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
छत्रपती संभाजी महाराजांना छळ करुन मारले त्या औरंग्याची भलामण करणाऱ्या अबू आझमीला लाज वाटायला हवी, अशी टीका शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. औरंग्याची स्तुती करणाऱ्या अबू आझमीला विधीमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. कायंदे यांनी केली.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान शिवसेना खपवून घेणार नाही. अबू आझमी सारख्या प्रवृत्तींविरोधात शिवसेना राज्यभर आक्रमक आंदोलन करणार असल्याचे त्या म्हणाल्या.