“सिद्धेश्वर हनुमान” शिरसाळा ता.बोदवड प्रवेशद्वारासाठी आमदार निधीतून 30 लक्ष रुपये मंजूर !
गेला दोन ते तीन दिवसांपूर्वी मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिरसाळा येथील “सिद्धेश्वर हनुमान” मंदिराकडे जाणाऱ्या इंदोर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील प्रवेशद्वार एका कंत्राटदाराच्या भरधाव वाहन चालकाने बेजबाबदार पणे वाहन चालवून या प्रवेशद्वारला मोठा अपघात घडवून आणला व प्रवेशद्वाराची नासधूस केली. यातून अनेक हनुमान भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या व पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करून तसेच बोदवड मलकापूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी हनुमान भक्तांनी केली होती.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून शिरसाळा सिद्धेश्वर हनुमान मंदिर प्रवेशद्वार बांधकामासाठी सुमारे 30 लाख रुपये मंजूर केले आहे. त्यामुळे आता लवकरच न भूतो न भविष्यती असे भव्य प्रवेशद्वार येथे होणार असल्याने हनुमान भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित ठेकेदाराने सदरील प्रवेशद्वार नासधूस केल्याचे मान्य केले परंतु क्षमा मागितली नाही उलटपक्षी मी मी ची भाषा वापरून, आणि हनुमंताने माझ्याकडून प्रवेशद्वार स्वतः नासधूस करून घेतले व मीच हे प्रवेशद्वार बांधेल असे प्रसार माध्यमांत जाहीर केले होते. यामुळे हनुमान भक्तांच्या भावना आणखीनच चिघळविण्याचा त्याने प्रयत्न केला होता. यामुळे संतप्त होत हनुमान भक्तांनी दि.१८ सप्टेंबर रोजी मलकापूर चौफुली बोदवड येथे रास्ता रोको आंदोलन केले व ठेकेदार तसेच ठेकेदारावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बोदवड पोलिस निरीक्षकावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदार निधीतून प्रवेशद्वारासाठी सुमारे 30 लक्ष रुपये मंजूर करून ठेकेदाराच्या गर्विष्ठ भाषेला चांगलीच चपराक दिली असून हनुमान भक्तांना दिलासा दिला आहे.