अमरावती, 27 मार्च (हिं.स.) : भर उन्हाळ्यात जेव्हा सर्वत्र पाणी आणि अन्नाचे दुर्भिक्ष असते. तेव्हा पक्षी अन्नपाणी शोधत असतात. मात्र त्यांना जेव्हा शाल्मली किंवा काटेसावरचे झाड दिसते. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. कारण हे झाड त्यांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था करत असते. दरम्यान, समाजात या झाडांविषयी असणाऱ्या विविध श्रद्धा-अंधश्रद्धांमुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढून संवर्धनाची गरजही निर्माण झाली आहे.
सरत्या फाल्गुन महिन्याबरोबर उन्हाची लाहीलाही वाढू लागते. थंडीतली आपली कोवळी सोनेरी कात टाकून माघातले ऊन भट्टीतल्या आगीसारखे तापू लागते. दुपारी उन्हाच्या झळा सहन होत नाहीत आणि मातीच्या मडक्यात निवांत जाऊन झोपावेसे वाटावे अशा उष्ण वाफा वाहू लागतात. वृक्ष, कोरड्या, मातकट, तपकीरी आणि करड्या धुळकट रंगांनी निसर्ग भरून जातो. निष्पर्ण, सांगाडे झालेल्या, पानोपानी झरलेल्या उदास झाडांकडे पाहवत नाही. विस्तीर्ण माळरानावर नजर पोचेल तिथपर्यंत ऊनच ऊन दिसू लागते. या उन्हापासून वाचायला कुठे तरी दूर दूर जावेसे वाटू लागते.
मग तुम्ही कुठेतरी एकांत निवांत ठिकाणी जाण्याचे ठरवता. गावच्या मूळ घरी, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी, एखाद्या मित्राकडे.. तुम्ही कुठेही जा.. जंगलात, डोंगरकपारीत, रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर, वेशीवर, रस्त्यावर, रेल्वेच्या ट्रॅकवर, पायवाटेववर, कुंपणाच्या आपल्याला काटेसावर भेटतेच भेटते.देशांत आढळणारी वनस्पती, ४० मीटर पर्यंत होते वाढ काटेसावर ही भारत, इंडोनेशिया, दक्षिण चीन, हाँगकाँग व तैवान या देशांत आढळणारी वनस्पती आहे. बॉम्बक्स सिबा हे तिचं शास्त्रीय. वीस ते चाळीस मीटर पर्यंत वाढणाऱ्या य झाडाला पांढऱ्या करड्या खोडावर अंगभर लहानमोठे शंकूच्या आकाराचे काटे असतात. म्हणूनच तिचं नाव काटेसावर. काटेसावरीला संस्कृत मध्ये तिच्या एकंदरीत देहबोलीला थोडेसे विजोडच असे शाल्मली नाव आहे.