मुंबई, 26 मार्च (हिं.स.)। मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक रोहन सातघरे यांनी आता मार्केटिंग क्षेत्रात नवी इनिंग सुरू केली आहे. ‘ट्रिंग ट्रिंग’, ‘रॉकेट वाले सैंय्या’, ‘हमराज’, ‘एक होता पाणी’ यांसारख्या वेबसीरीज आणि चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या रोहन यांनी ‘जगताप हाउसिंग’ या प्रतिष्ठित रिअल इस्टेट कंपनीसाठी मार्केटिंगची जबाबदारी स्वीकारली आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण मार्केटिंग मोहिमेचं सुकाणू ‘राब्ता प्रमोशन कंपनी’कडे आहे. रोहन सातघरे यांच्या दिग्दर्शन कौशल्याला ‘राब्ता’च्या अनुभवी मार्केटिंग टीमची साथ मिळणार आहे. रोहन सतघरे यांनी आजवर विविध ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी दर्जेदार कंटेंट तयार करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा अनुभव आणि सर्जनशील दृष्टिकोन यामुळे ‘जगताप हाउसिंग’च्या मार्केटिंगला एक नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याबाबत बोलताना रोहन सातघरे म्हणाले, “सिनेसृष्टीत काम करताना माझी नेहमीच स्टोरीटेलिंग आणि क्रिएटिव्हिटीवर पकड राहिली आहे. आता तीच ऊर्जा आणि अनुभव मार्केटिंगमध्ये वापरण्याचा मानस आहे. ‘जगताप हाउसिंग’सारख्या विश्वासार्ह ब्रँडसाठी काम करणे ही माझ्यासाठी नवी संधी आणि जबाबदारी आहे.” सिनेसृष्टीत आपल्या दिग्दर्शनाने प्रेक्षकांना मोहवून टाकल्यानंतर, रोहन आता मार्केटिंगच्या माध्यमातून ब्रँड्सना नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.